महावितरणची वीज चोरट्यांवर कारवाई! आकोडे टाकून सुरू होती वीजचोरी : गुन्हा दाखल
By विवेक चांदुरकर | Published: March 26, 2024 05:20 PM2024-03-26T17:20:59+5:302024-03-26T17:21:11+5:30
तारांवर आकोडे टाकून वीजचोरी करण्यांवर या मोहिमेंतर्गत कारवाइ करण्यात आली. पाच ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव राजा :महावितरणच्या पिंपळगाव राजा भाग-२ कार्यालयांतर्गत वीज चोरट्याविरोधात २६ मार्च रोजी धडक मोहीम राबविण्यात आली. तारांवर आकोडे टाकून वीजचोरी करण्यांवर या मोहिमेंतर्गत कारवाइ करण्यात आली. पाच ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव राजा वीज उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या हिवरा, तांदूळवाडी, बेलखेड, कवडगाव, जळका या गावात मोहीम राबविण्यात आली. सध्यास्थितीत मार्च महिना असल्याने महावितरणकडून वीज बिल वसुली, ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान बेलखेड येथील संजय प्रल्हाद राठोड या ग्राहकाचे वीज देयक थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर पडताळणी मोहिमे दरम्यान या ग्राहकाचा वीज पुरवठा अनधिकृत रित्या चालू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संजय प्रल्हाद राठोड यांच्यावर भारतीय विद्युत कायदा २००३कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हिवरा बुद्रुक येथील महादेव किसन सोळंके, तांदुळवाडी येथील रंजना विनोद सूर्यवंशी, सूर्यभान सोनाजी शिरसाट, प्रमिलाबाई सूर्यवंशी व मालतीबाई प्राणसिंग चव्हाण या ग्राहकांवर देखील कलम १३५ नुसार कार्यवाही करण्यात आली.
महावितरण कंपनीचे भाग २ चे स्थानिक अभियंता अनुपसिंग राजपूत व भाग १ चे अभियंता पंकज मिश्रा धडक मोहीम राबवित आहे. वीज ग्राहकांनी वीजचोरी न करता अधिकृतरित्या वीज वापरावी तसेच नियमित वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन अभियंता अनुपसिंग राजपूत यांनी केले आहे.