क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या दवाखान्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:18 PM2021-02-14T12:18:05+5:302021-02-14T12:18:15+5:30
Khamgaon News माहिती देण्यास कुचराई करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी शासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. जे रुग्ण आजार लपवून खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतात. त्यावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी आता खाजगी रुग्णालय, लॅब, मेडिकलचालकांना क्षय रुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. माहिती देण्यास कुचराई करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी दिला आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद करून त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, बंधनकारक आहे.
नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून अशा रुग्णांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थानी क्षयरोग निदान करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रो बायोलॉजी, प्रयोगशाळा, रिव्हर्स रेडिओलॉजी, सुविधा क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथॉलॉजी, रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेत्यांना शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे.
शिक्षेसह दंडाचीही तरतूद
जी संस्था नोंदणी करणार नाही, अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीस सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे.
त्यामुळे रुग्णालये, औषध विक्रेते, पॅथोलॉजिस्ट यांनी रुग्णांची माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी केले आहे.