विना परवानगी लग्न समारंभ करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:25+5:302021-04-21T04:34:25+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही काही ठिकाणी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. लग्नसोहळे करणाऱ्यांनी लग्नमंडपात सावधान होण्याआधी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही काही ठिकाणी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. लग्नसोहळे करणाऱ्यांनी लग्नमंडपात सावधान होण्याआधी स्वत:च पहिले सावधान होणे गरजेचे झाले आहे.
अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथे १८ एप्रिल रोजी रमेश गोविंदा जाधव (वय ४५, रा. धोत्रा नाईक) यांनी त्यांच्या मुलीचा लग्न समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु लग्नसमारंभासाठी तहसीलदार चिखली यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने अखेर अमडापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच धोत्रा नाईक येथील गजानन तोताराम मिसाळ (वय ४५) यांनीसुद्धा त्यांच्या मुलींचे लग्न १९ एप्रिल रोजी आयोजित केले होते. परंतु त्यांनीसुद्धा कोणतीही शासनाची परवानगी न घेतल्याने त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही वधूपित्यांविरुद्ध तलाठी वनिता किशोर मोरे यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्ररीवरून विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे लग्न सोहळे साजरे करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना वाढतोय, नियम पाळा : ठाणेदार वानखेडे
कोरोना महामारीच्या संकटातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी कुठेही गर्दी करू नये, अशा शासनाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. शासनाच्या आदेशामध्ये २५ लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पाडा, असे असताना विनाकारण गर्दी जमू नये, असे आवाहन ठाणेदार अमित वानखेडे यांनी केले आहे. मुलीकडील असो वा मुलाकडील असो आनंदाचा क्षण असतो परंतु सध्या कोरोना महामारी या सारखे आजार पसरत असल्याने वऱ्हाडी मंडळीनी जास्त लोक न जमवता कमीत कमी लोकांमध्ये लग्नसोहळे साजरे करावे, असे आवाहनही ठाणेदारांनी केले आहे.