३५ लाख घेऊनही मका न देणाऱ्या तिघांवर कारवाई; तिसऱ्या आरोपीला गुरुवारी अटक
By सदानंद सिरसाट | Published: October 20, 2023 02:52 PM2023-10-20T14:52:19+5:302023-10-20T14:52:32+5:30
न्यायालयाने दिला जामीन
मलकापूर (बुलढाणा) : शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात एका व्यापाऱ्याला ३५ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार पोलिस तपासात निष्पन्न झाला आहे. तीन भागीदारांनी फसवणूक केल्याने मलकापूर शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज अग्रवाल याला गेल्या काळात प्रथम अटक व जामीन, तर संतोष अग्रवाल याला अटकपूर्व जामीन मंजूर मिळाला. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी राजेश गांधी याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उपस्थित केले असता जामीन मंजूर झाला आहे.
शहरातील श्रीकृष्ण सुभाष मोरे यांनी १ नोव्हेंबर २०२२ रोजी या घटनेची तक्रार दिली होती. त्यामध्ये पंकज बन्सीलाल अग्रवाल (जय गणेश ट्रेडर्स), राजेश गांधी (संकल्प ट्रेडर्स), संतोष गिरधारीलाल अग्रवाल (शाकंबरी जिनिंग अँड प्रेसिंग) या तिघांनी भागीदार असल्याचे सांगितले होते. मका विक्री करण्याच्या नावाखाली ३५ लाख रुपयांच्या मोबदल्यात मका पाठवला नाही, त्यामुळे फसवणूक केल्याचे म्हटले.
तक्रारीनुसार मलकापूर शहर पोलिसांनी तिघांवर भादंविच्या कलम ४२०, ४०९ नुसार गुन्हा दाखल केला. तर, पंकज अग्रवाल याला अटक केली. अधिक तपासात मुख्य आरोपी पंकज अग्रवाल व साक्षीदार संदीप यांच्या जबाबातून तसेच दिलेल्या रक्कमेचे ‘सेम डे हस्तांतरण’ या आधारे प्रकरणात राजेश गांधी व संतोष अग्रवाल हे दोघेही पंकज अग्रवाल यांचे भागीदार असल्याचे निष्पन्न झाले. तरीही रकमेच्या मोबदल्यात मका दिला नसल्याचे पुढे आले. प्रकरणाचा तपास ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय स्मिता म्हसाये यांनी केला.
अशी झाली फसवणूक
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पंकज अग्रवाल, राजेश गांधी, संतोष अग्रवाल हे तिघे भागीदार असल्याची तोंडी बतावणी केली. तक्रारदार श्रीकृष्ण मोरे यांनी पंकज अग्रवाल यांच्यासोबत व्यवहार करून मका खरेदी करण्यासाठी त्यांच्या जय गणेश ट्रेडर्सच्या खात्यात ३५ लाख रुपये हस्तांतरीत केले. तरीही मका देण्यात आला नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार होती.