शुल्क वसुलीची तक्रार असलेल्या शाळांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:33 AM2021-02-28T11:33:12+5:302021-02-28T11:33:29+5:30
School Fees News शाळांची संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना संसर्ग कालावधीमध्ये शाळा बंद असतानाही काही शाळांकडून वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही, त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी तयार व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर काढणे, मागील सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत ज्या शाळांसंदर्भात अशा तक्रारी आहेत, त्या शाळांची संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
खासगी शाळांमधील शुल्काबाबत शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम २०११ व महाराष्ट्र शैक्षणिक अधिनियम २०१६ तयार केलेले आहे. सोबतच अधिनियमात सुधारणा करण्यसाठी समितीही गठीत आहे. समितीमध्ये संचालक बालभारती सहसचिवांसह अन्य व्यक्तींचा समावेश आहे. पालकांच्या तक्रारी असल्यास या समितीकडे पाठविण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.