बनावट मद्यासाठी प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्यांवर कारवाई, लाखोचा मुद्देमाल जप्त
By भगवान वानखेडे | Published: September 6, 2022 03:35 PM2022-09-06T15:35:02+5:302022-09-06T15:35:02+5:30
बनावट विदेशी मद्यासाठी जीवंत प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.
बुलढाणा :
बनावट विदेशी मद्यासाठी जीवंत प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गणेशोत्सव कालावधीमध्ये अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि विक्री विरोधात ३१ ऑगस्ट रोजी बुलढाणा ते खामगाव रस्त्यावर वरवंड शिवारात कार क्रमांक (एमएच-३० एई १४०५) तपासणी केली असता कारमध्ये बनावट विदेशी मद्यासाठी वापरण्यात येणारे एकुण पाच हजार नवीन बुचे आढळून आली. ही बुचे महेंद्र नामदेवराव गोदे (रा. भारती प्लॉट, बाळापूर नाका, अकोला), श्रीकृष्ण दादाराव गावंडे (रा. घुसर, ता. जि. अकोला) या दोघांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. यात कारसह एकुण १ लाख ७३ हजार ८० रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात बनावट मद्य विक्रीची शक्यता
या कारवाईनंतर गणेशोत्सवात जिल्ह्यात कमी प्रतीचे बनावट मद्य विक्री होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बनावट मद्य आढळण्याची शक्यता असल्याची शक्यता आहे. तेव्हा अशांवर कारवाईसाठी नागरिकांनी अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि विक्री होत असल्याचे आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.