खामगाव तालुक्यातील एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई
By अनिल गवई | Published: December 22, 2023 07:58 PM2023-12-22T19:58:10+5:302023-12-22T19:58:19+5:30
खामगाव पोलीसांचा होता प्रस्ताव
खामगाव: तालुक्यातील ग्रामीण भागात दहशत निर्माण करणाऱ्या एकावर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. परिणामी या दादास आता ११ महिन्यांसाठी न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे. त्यामुळे परिसरातील असामाजिक तत्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खामगाव तालुक्यातील खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अंबिकापूर चितोडा येथील रमेश ऊर्फ पोत्या गौतम हिवराळे (३७) हा गुंडप्रवत्तीचा असून त्याचे विरुध्द मारामारी करणे, दंगल करणे, चोऱ्या करणे अशा प्रकारचे विविध गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. तसेच हा व्यक्ती अत्यंत धोकादायक, समाजविघात कृती करणारा असल्याने त्याचे विरुध्द पोलीस अधिक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एमपीडीएअंर्गत (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सर्वंकष चौकशी करून अनुषंगीक कार्यवही करण्यास मान्यता दिली. त्यामुळे रमेश ऊर्फ पोत्या गौतम हिवराळे याला आता ११ महिन्यासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.