विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:37 PM2019-07-31T12:37:24+5:302019-07-31T12:37:52+5:30
पोलिस प्रशासनाच्यावतीने ३० जुलै रोजी शहरातील २० वाहन धारकांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : परिवहन विभागाच्या नियमांची पायमल्ली करून विद्यार्थी वाहतूक करणाºया २० वाहन चालकांवर शहर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. ‘खामगावात विद्यार्थ्यांचा शाळा प्रवास असुरक्षीत’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २४ जुलै रोजी स्टिंग आॅपरेशन प्रकाशीत केले. त्यानंतर पोलिस प्रशासनाच्यावतीने ३० जुलै रोजी शहरातील २० वाहन धारकांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली.
परिवहन विभागाच्या नियमांची पायमल्ली करीत शहरात आॅटो, व्हॅन आणि इतर चारचाकी वाहनांतून विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक केली जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले. यासंदर्भात २४ जुलै रोजी स्टिंग आॅपरेशन तर ३० जुलै रोजी ‘सिटीजन जर्नालिस्ट’ या सदरात विद्यार्थ्यांच्या असुरक्षीत वाहतुकीचा विषय ऐरणीवर आणला. त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाºया विविध वाहन धारकांवर कारवाई केली. यामध्ये १७ वाहन धारकांवर मोटार वाहन कायदा ६६/ १९२ अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांचे ई-चालान फाडण्यात आले. तर ३ वाहन धारकांवर भादंवि कलम २८३ अन्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाºया वाहन धारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
कारवाईमुळे वाहन धारकांची तारांबळ!
पोलिसांच्या या कारवाईमुळे विद्यार्थी वाहतूक करणाºया अनेक वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी काही आॅटोंना सुरक्षेसाठी जाळ्याही नसल्याचे आढळून आले. तर काही आॅटो चालक परवाना नसताना विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.