शिक्षणाधिकार्यांचा शिक्षकांवर कार्यवाहीचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:03 AM2017-11-09T01:03:56+5:302017-11-09T01:05:03+5:30
शासनाच्या संकलित चाचणीचा बोजवारा उडत असल्याचे शिक्षणाधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकांवर कार्यवाहीचा आदेश दिला. त्यांनी शाळेच्या हजेरीपत्रकावर एका दिवसाचे वेतन थांबल्याचा शेरा दिल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनाळा : येथील जि.प. मुलांची केंद्र शाळेला शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख यांनी आज ८ रोजी दुपारी ३ वाजता आकस्मित भेट दिली असता त्यांना शाळेत एकही विद्यार्थी हजर आढळला नाही. यामुळे शासनाच्या संकलित चाचणीचा बोजवारा उडत असल्याचे शिक्षणाधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकांवर कार्यवाहीचा आदेश दिला. त्यांनी शाळेच्या हजेरीपत्रकावर एका दिवसाचे वेतन थांबल्याचा शेरा दिल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बसस्थानक परिसरात जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा आहे. यामध्ये एक ते सातवीपर्यंत ४00 च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यांना १४ शिक्षक ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत. वादग्रस्त मुख्याध्यापिका शोभा सारोळकर या असून, त्यांचा कार्यकाळ अनेक बाबतीत वादग्रस्त ठरला आहे. आज संपूर्ण राज्यभर संकलित चाचणी क्र.१ चा श्रीगणेशा झाला असून भाषा विषयाचा पेपर वेळेपत्रकानुसार ठरवण्यात आला होता. ही चाचणी वर्ग १ ते ८ करिता घेण्यात आली होती. संग्रामपूर तालुक्यात सर्वच शाळांवर ही परीक्षेला सुरुवात झाली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात ८ ते ११ या दरम्यान संकलित चाचणी- १ चे आयोजन करण्यात आले. त्यानुसार कार्यालयातील सर्व अधिकार्यांना परिसरातील शाळांना भेटी देण्याचे आदेश आहेत. यामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा जि.प. मुलांच्या केंद्र शाळेला अचानक भेट दिली. यामध्ये शाळेत ४00 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी हजर नसल्याने शिक्षणाधिकार्यांनाच चक्क डोक्यावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे. त्यांना सर्व शिक्षक कार्यालयात बसलेले आढळले त्यांचा पारा चढला व त्यांनी हजेरीपत्रकावर शाळेची दयनीय अवस्था, शाळेचा ढेपाळलेला कारोभार, शिक्षकांचा पगार कपात करण्याचा शेरा दिला.