प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळी सक्रिय
By admin | Published: November 18, 2016 02:36 AM2016-11-18T02:36:44+5:302016-11-18T02:36:44+5:30
सिल्लोड-धाडदरम्यान गुंगीचे औषध देऊन महिलेचे दागिने पळविले!
डोमरुळ(जि. बुलडाणा), दि. १७- प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे अशाप्रकारची टोळी या भागात सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे.
बुलडाणा तालुक्यातील डोमरूळ माहेर असलेल्या कांताबाई सुरेश अपार, रा. सिल्लोड जि. औरंगाबाद या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता सिल्लोडवरून पुणे-जळगाव (जामोद) बसने माहेरी येत होत्या; मात्र त्या धाड येथे न उतरता जळगाव (जामोद) येथे बसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. कांताबाई अपार या डोमरूळ येथील माहेरी १६ नोव्हेंबर रोजी पुणे-जळगाव (जामोद) क्र. एम.एच.४0, एन ६३६५ क्रमांकाच्या बसने सिल्लोडवरून येत होत्या. त्या गाडीत आधीच बसलेल्या एक महिला आणि तिच्यासोबत बसलेल्या पुरुषाने त्यांना जागा देऊन गप्पा गोष्टी करत सलगी वाढवली. गप्पा गोष्टी करताना भोकरदन जि. जालन्याच्या पुढे आल्यावर त्या महिलेने कांताबाई अपार यांना बिस्कीट खाण्याचा आग्रह केला. त्यांनी ते बिस्कीट घेतले. गप्पागोष्टी करताना ती महिलासुद्धा बिस्कीट खायला लागली. त्यामुळे कांताबाईनेसुद्धा माहोरा जवळ असताना बिस्कीट खाण्यास सुरुवात केली. तोपर्यंंंत घरून आलेला फोन, नातेवाइकाच्या फोनवर त्यांचे बोलणे होत होते; परंतु धाडमध्ये त्यांची वाट बघत असलेले नातेवाईक चार तास झाले; मात्र बस येईना व फोनही लागत नसल्याने सर्वांंंची तारांबळ उडाली. नांदुरा येथे याच बसवर नातेवाइकांना पाठवून शोध घेतला. वाहकाला विचारले तर बसमध्ये अशा नावाची महिला नाही म्हणून सांगितले; परंतु शेवटी जळगाव (जामोद) येथील नातेवाइकांना फोनद्वारे कळवून बस बघण्यास सांगितली.
त्या बसच्या वेळेवर तेथे हजर झाले. बसमधील सर्व प्रवासी उतरून बस आगारात जाण्यास निघाली. बस थांबवून परत वाहकाला कांताबाईविषयी विचारणा केली तेव्हा दोघे जण बसमध्ये चढून सिटाखाली बघत असताना शेवटच्या सिटखाली कांताबाई बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. तेव्हा त्यांना बाहेर काढून तेथील खासगी दवाखान्यात भरती करून तेथून बुलडाणा येथे आणले. १७ नोव्हेंबर रोजी दवाखाण्यातून त्यांना घरी आणले. त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची पोथ, कानातील रिंगा, चेन, बोरमाळ, मनी मंगळसूत्र, तर चांदीचे पायातील जोडवे त्या चोरट्यांनी काढून घेतले. त्यांचे पती सुरेश अपार यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन सदर घटनेची माहिती दिली. बुलडाणा पोलिसांनी सदर घटनेची माहिती घेऊन कांताबाई यांचा जबाब घेऊन सिल्लोड जि. औरंगाबाद येथे तक्रार वर्ग केली. सदर घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जोगदंडे हे करीत आहे.
या अगोदर १६ नोव्हेंबर रोजी धाड बसस्थानकावर कुंबेफळ येथील महिलेची बसमध्ये चढत असताना गळ्यातील पोथ चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.