जळगाव जामोद तालुक्यात रासायनिक खते, बियाण्यांचा पुरेसा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 07:29 PM2021-05-29T19:29:19+5:302021-05-29T19:29:41+5:30
Jalgaon Jamod News : कपाशी बियाण्यांचे ४५० व ४७५ ग्रॅमचे ८५००० हजार पॅकेट उपलब्ध झाले असून त्याची विक्री १ जून नंतर करण्यात येणार आहे.
-नानासाहेब कांडलकर
जळगाव जामोद : तालुक्यात विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा साठा ४४२९ मॅट्रिक टन एवढा असून सोयाबीन बियाण्याची उपलब्धता १९७० क्विंटल एवढी आहे. कपाशी बियाण्यांचे ४५० व ४७५ ग्रॅमचे ८५००० हजार पॅकेट उपलब्ध झाले असून त्याची विक्री १ जून नंतर करण्यात येणार आहे.तालुक्यात सर्वाधिक १९ हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा करण्यात येणार असून सुमारे ११ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड या वर्षी होण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने आवश्यक कपाशी व सोयाबीन बियाणांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. रासायनिक खतांमध्ये युरियाचा साठा १४५५ मेट्रिक टन उपलब्ध असून इतर एनपीएस व एनपीके खतांचा साठा सुद्धा पुरेसा उपलब्ध आहे. रासायनिक खतांची मागणी ज्याप्रमाणे होईल तेवढा साठा उपलब्ध करून देण्यात येईल. रासायनिक खतांचे महत्तम विक्री मूल्य जे आहे त्यापेक्षा जास्त भावाने कोणीही या खतांची खरेदी करू नये असे कृषी अधिकारी आर.एस.नावकर यांनी सांगितले.
सोयाबीनची उगवण चाचणी करूनच पेरणी
सोयाबीन बियाण्याची उगवण चाचणी करूनच पेरणी करावी अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.साधारणपणे ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नये. सोयाबीन बियाण्याची उपलब्धता व त्याची किंमत लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टोकण पद्धतीने हात लागवड करावी ज्यामुळे बियाण्याची बचत होवून दोन झाडात योग्य अंतर साधता येईल. सोयाबीन पिकाची धूळपेरणी करू नये असेही कृषी विभागाने सूचित केले आहे.
"गुलाबी बोंड अळीची साखळी तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाची लागवड 1जुन नंतरच करावी.खते व बियाणे यांचे पक्के बिल कृषी केंद्राकडून घ्यावे व ते जपून ठेवावे.बियाण्यांची पिशवी,थोडे बियाणे हे सुद्धा सांभाळून ठेवावे. भविष्यात काही समस्या उद्भवल्यास त्याचा उपयोग होवू शकतो."
-आर.एस.नावकर,
कृषी अधिकारी,
पंचायत समिती,जळगाव (जामोद)