गारखेड येथील समस्यांची प्रशासनाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:41+5:302021-09-07T04:41:41+5:30
गारखेड येथील १९७२ मध्ये बांधलेला मोती तलाव फुटून गाव जलमय होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे. याचसंदर्भात गावाचे इतरत्र पुनर्वसन व्हावे ...
गारखेड येथील १९७२ मध्ये बांधलेला मोती तलाव फुटून गाव जलमय होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे. याचसंदर्भात गावाचे इतरत्र पुनर्वसन व्हावे अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. रविवारी ग्रामस्थांनी पत्रकारांना गावात बोलावून याबाबतची वस्तुस्थिती दाखविली व आपल्या पुनर्वसनाच्या मागणीचा पुनरोच्चार केला होता. माध्यमात वृत्त प्रकाशित झाल्याने प्रशासनाने घाईघाईने सोमवारी गावात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना तहसीलदार सुनील सावंत यांनी गावाच्या पुनर्वसनाची जी मागणी होत आहे त्याविषयी अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, तलावाला सांडवा असल्याने तलाव फुटण्याचा धोका प्रथमदर्शनी वाटत नसल्याचा शेरा त्यांनी दिला आहे. असे असले तरीही संबंधित विभागाकडे हा विषय पाठविला जाणार असल्याचे ते म्हणाले. तहसीलदार सावंत यांच्यासोबत असलेले पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता ढगे यांनी या तलावाची पाहणी करून गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, गावात रस्ते नाही. पाऊल वाटेने गावात पोहोचावे लागते. यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कळवून येथील रस्त्याची समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जुनेद सिद्दीकी, पोलीस पाटील किशोर चव्हाण, स्थानिक तलाठी, राम लव्हकरे, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.