जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या चार रुग्णालयांना प्रशासनाने दिली नाेटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:19 AM2021-05-15T11:19:15+5:302021-05-15T11:19:33+5:30
Buldhana News : जिल्ह्यातील चार रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना बाधित रुग्णांवर जनआरोग्य योजनेतंर्गत लाभ न देणाऱ्या जिल्ह्यातील चार रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक यांनी त्यास दुजोरा दिला आहे. मात्र त्याला संबंधित रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत नॉन व्हेंटीलेटर आणि व्हेंटीलेटर अशा दोन पॅकेजमध्ये या योजनेतंर्गत कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र यासंदर्भात आवश्यक ती जनजागृती न झाल्यामुळे सामान्य व्यक्तींना याची कल्पनाच नसल्याचे समोर आले आहे. त्यातही अनुषंगीक योजनेचा कोरोना बाधित रुग्णांना लाभ न दिल्याने या नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी दिली. मेहकरमधील दोन व बुलडाण्यातील दोन हॉस्पीटलला या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे ‘रेस्पीरेटरी फेल्युअर’ पॅकेज अंतर्गत प्रामुख्याने हा लाभ दिला जातो. कोरोना नावाने त्यात वेगळे असे पॅकेज नसले तरी ‘रेस्पीरेटरी फेल्युअर’ पॅकेज अंतर्गत दोन प्रकारमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर योजनेतंर्गत उपचार करता येतो. मात्र खासगी रुग्णालयांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर येथील दोन व बुलडाणा शहरातील दोन रुग्णालयांना याबाबत परवानगी देण्यात आलेली आहे. या चारही रुग्णालयाकंडून अनुषंगीक विषयास प्राधान्य दिल्या गेलेले नाही.