घरातील रुग्णांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:42+5:302021-05-28T04:25:42+5:30
सिंदखेडराजा : शहरासह तालुक्यातील कोरोनाचे घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांना तत्काळ विलगीकरण केंद्रात पाठविण्याचे आदेश राज्य सरकारने काढताच प्रशासन सक्रिय ...
सिंदखेडराजा : शहरासह तालुक्यातील कोरोनाचे घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांना तत्काळ विलगीकरण केंद्रात पाठविण्याचे आदेश राज्य सरकारने काढताच प्रशासन सक्रिय झाले आहे़. रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना विलगीकरण केंद्रात जाऊन उपचार घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील शंभरपेक्षा जास्त रुग्ण कोरोना चाचणी सकारात्मक आल्यापासून गृह विलगीकरणात आहेत. कोरोना केंद्रातून औषधी घेऊन घरीच थांबण्याची मुभा यापूर्वी देण्यात आली होती़; परंतु सरकारने हा निर्णय रद्द केल्यानंतर आता तालुका, आरोग्य प्रशासन गावा-गावात जाऊन घरी असलेल्या रुग्णांना गावात असलेल्या विलगीकरण केंद्रात पाठवीत आहेत. दरम्यान, ज्या गावात रुग्ण आढळले त्या गावात यापूर्वीच शाळा किंवा तत्सम् ठिकाणी विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असल्याने प्रशासनावरील मोठा ताण कमी झाला आहे. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रुग्णांची संख्या पाहता ही संख्या अन्य ठिकाणच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे जाणवते.
८२ रुग्ण हाेते हाेम क्वारंटीन
आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६,किनगाव राजा १०, मलकापूर पंग्रा ०९ व साखर खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १५ रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व रुग्णांना त्या त्या गावातील विलगीकरण केंद्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात ३२ रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, मंगळवारीच आदेश प्राप्त झाल्याने पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रुग्ण असलेल्या घरी जाऊन तत्काळ कोविड सेंटरमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या आहेत़. गुरुवारपर्यंत रुग्ण कोविड सेंटरमध्ये न गेल्यास गरज पडल्यास पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.