चिखलीत लॉकडाऊनसाठी प्रशासनाचे 'मास्टर प्लॅनिंग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:49+5:302021-02-23T04:52:49+5:30

चिखली शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी यापूर्वी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले ...

Administration's 'master planning' for mudslide lockdown | चिखलीत लॉकडाऊनसाठी प्रशासनाचे 'मास्टर प्लॅनिंग'

चिखलीत लॉकडाऊनसाठी प्रशासनाचे 'मास्टर प्लॅनिंग'

Next

चिखली शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी यापूर्वी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. परंतु, रुग्णवाढीचा वेग थांबत नसल्याने निर्बंध कठोर करीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये चिखली तालुक्याचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चिखली परिषद क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासह २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्याचे आदेश धडकताच स्थानिक महसूल, पोलीस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'मास्टर प्लॅनिंग' केले आहे. उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार अजितकुमार येळे, ठाणेदार गुलाबराव वाघ, न. प. मुख्याधिकारी अभिजित वायकोस व इतर अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता शहरातील मुख्य रस्त्यांवर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. १ मार्चच्या सकाळपर्यंत लागू असलेल्या या लॉकडाऊनला सुरुवात झाल्याने या काळात कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता लॉकडाऊन जाहीर झाल्याने पालिका प्रशासनासह, महसूल व पोलीस प्रशासन सज्ज असून लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी फौजफाटा रस्त्यावर तैनात करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा !

संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले असतानाच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी चिखली शहरातील अनेक भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

शहरवासियांकडून प्रतिसाद

शहरात यापूर्वी संचारबंदीअंतर्गत सायंकाळी ५ वाजेनंतर सर्व दुकाने बंद केली जात होती. लॉकडाऊन जाहीर झाल्याचे कळताच व्यावसायिकांनी ५ वाजेपूर्वीपासूनच सर्व प्रतिष्ठाणे बंद करण्यास सुरुवात केली होती. यामुळे ६ वाजेनंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. रस्त्यांवर तुरळक प्रमाणातच वाहतूक सुरू होती.

Web Title: Administration's 'master planning' for mudslide lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.