एकफळ गावात पोहोचली प्रशासकीय चमू
By admin | Published: September 5, 2014 12:32 AM2014-09-05T00:32:06+5:302014-09-05T00:32:06+5:30
लोकमतच्या दणक्याने प्रशासन जागी; सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाच्या संयुक्त चमूने एकफळ गावास भेट दिली.
फहीम देशमुख /शेगाव
शेगाव तालुक्यातील एकफळ व कुरखेड गावाचे विदारक चित्र आज ह्यलोकमतह्ण ने प्रकाशित करताच प्रशासन खळबळून जागे झाले. आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या संयुक्त चमूने एकफळ या गावास भेट देऊन चर्चा केली. नागरिकांच्या समस्या एकून अधिकार्यांनी पाहणी केली असता, या गावाला रस्ता करण्यासाठी प्रशासनाला वन विभाग, रेल्वे विभाग यांच्या परवानगीसह तब्बल चार पूल बांधावे लागणार असल्याचे समोर आले.
२५0 लोकसंख्या असलेले एकफळ हे गाव शेगावपासून ५ कि . मी. अंतरावर असतानासुद्धा येथील नागरिकांना शेगावात पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अळसणा गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. दीड कि. मी. अंतराच्या या रस्त्यासाठी आळसणा भागातील ४ शेतकर्यांनी दानपत्र देण्यासाठी नकार दिल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ह्यलोकमतह्ण च्या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.के.परिहार, कनिष्ठ अभियंता जी.के. चोपडे, प्रदीप मसने यांच्यासह नायब तहसीलदार एस. झेड. पवार, मंडळ अधिकारी पद्मणे, तलाठी डाबेराव यांची चमू एकफळ गावात पोहोचली. अधिकारी गावात पोहोचल्याची माहिती मिळताच प्रत्येक घरा तील माणसे गावाच्या चौकात जमा होऊन अधिकार्यांना आपल्या समस्या सांगू लागले. या चमूने नागरिकांच्या समस्या ऐकून रस्त्याची पाहणी केली आणि समस्या जाणून घेतल्या. या गावाला मुख्य मार्गावर जोडण्यासाठी तब्बल चार पूल बांधावे लागणार असून, या पुलांसाठी किमान एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय वनविभागाचीही जमीन या रस्त्यामध्ये असल्याने त्यांची परवानगी मिळवावी लागणार आहे. शिवाय रेल्वेच्या हद्दीला लागुन पुलाचे काम करणार असल्याने त्यासाठीही रेल्वे विभागाची परवानगी लागणार आहे व हे सर्व मिळाल्यानंतरही याच मार्गात एक शेतकरी अल्पभूधारक असून, त्याच्या शेतातून रस्ता गेल्यास तो भूमिहीन होऊ शकतो. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे शेती आहे ते दानपत्र द्यायला तयार नाहीत. या सर्व समस्यांवर आता शासनाला मार्ग काढावयाचा आहे.
आज गावाला भेट देणार्या अधिकार्यांनी याबाबतचा संपूर्ण अहवाल आपण वरिष्ठांना सादर करणार असल्याचे गावकर्यांना सांगितले.
शिवाय विधानसभा निवडणुकीवरील बहिष्कारही मागे घेण्याची विनंती या अधिकारी वर्गाने गावातील नागरिकांना केली. यावेळी पोलिस पाटील दिनकरराव देशमुख, अशोक कराळे, सुधाकर देशमुख, आनंदा देशमुख, पंजाब वानखडे, शिवरतन परदेशी, रवींद्र वानखडे, नागोराव देशमुख, महेश देशमुख यांच्यासह गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
** रस्त्यासाठी दोन कोटी
एकफळ हे गाव तालुक्याला जोडण्यासाठी दोन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी प्राप्त झाल्यास या मार्गावर चार छोटे पूल आणि भूसं पादनाची कामे होऊ शकतात. प्रशासन असा प्रस्ताव तयार करीत आहे.
** एकफळसाठी ४0 लक्ष
एकफळ ते आळसणा या रस्त्यासाठी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये ४0 लक्ष रुपयेसुद्धा उपलब्ध झालेले आहे; मात्र निधी उपलब्ध असला तरी इतर समस्या सुटताना दिसत नाहीत.