चिखली बाजार समितीवर प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 11:30 AM2021-02-04T11:30:34+5:302021-02-04T11:31:09+5:30
Chikhali Market Committee News गितेशचंद्र साबळे यांनी ३ फेब्रुवारी रोजी प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून पुन्हा प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. बाजार समितीचे प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक गितेशचंद्र साबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २५ जून २०२० रोजी संपुष्टात आल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी सहाय्यक निबंधक साबळे यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. मात्र, या विरोधात समितीचे सभापती ज्ञानेश्वर सुरूशे यांनी पणन संचालक म. रा. पुणे यांच्याकडे अपील दाखल करून प्रशासक नेमणुकीला स्थगिती मिळविली होती. त्यामुळे समितीच्या संचालक मंडळाकडे पूर्ववत पद्भार सोपविण्यात आला होता. दरम्यान, सभापती सुरूशे यांच्या अपील अर्जावर पणन संचालकांनी अंतिम सुनवाईत प्रशासक नियुक्तीचे आदेश कायम केले आहेत. तथापि, कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीच्या संचालक मंडळास मुतदवाढ मिळण्याबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर शासनाकडूनही कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मंजूर न झाल्याने जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी समितीवर प्रशासक नियुक्तीच्या २९ जून २०२० च्या आदेशानुसार सहाय्यक उपनिबंधकांना समितीचे प्रशासकपद स्वीकारून अहवाल सादर करण्याचे आदेश ३ फेब्रुवारी रोजी दिले आहेत. या आदेशानुसार सहाय्यक उपनिबंधक गितेचंद्र साबळे यांनी ३ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला आहे.