‘टीसी’शिवाय होणार अन्य शाळेत प्रवेश!

By Admin | Published: May 17, 2017 12:35 AM2017-05-17T00:35:48+5:302017-05-17T00:35:48+5:30

आॅनलाइन प्रक्रियेत टीसीची गरजच नाही!

Admission to other schools without 'TC' | ‘टीसी’शिवाय होणार अन्य शाळेत प्रवेश!

‘टीसी’शिवाय होणार अन्य शाळेत प्रवेश!

googlenewsNext

नितीन निमकर्र्डे 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शाळांमधील प्रवेशाची प्रक्रिया आॅनलाइन झालेली असून, यात शाळा सोडण्याचा दाखला नसला, तरी प्रवेश प्रक्रिया होऊ शकते. शाळा सोडल्याचा दाखला पाहिजेच, असे नाही; मात्र याची माहिती नसल्याने काही पालक टीसीकरिता आग्रह धरत असल्याचे दिसून येते.
शासनाने राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड आॅनलाइन केला असून, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर स्टुडंट पोर्टलमध्ये तो अपलोड केलेला आहे. शासनाची मान्यताप्राप्त प्रत्येक शाळेस विद्यार्थ्याचा संपूर्ण तपशील या स्टुडंट पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा बदलविताना एका शाळेतून टीसी काढून ती दुसऱ्या शाळेकडे देण्याची गरज नाही. संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाने ज्या नवीन शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या शाळेच्या व्यवस्थापनाकडे फक्त विनंती क रावी. त्यावर ती शाळा प्रवेश देण्यास तयार असेल, तर जुन्या शाळेकडे ट्रान्सफरची आॅनलाइन रिक्वेस्ट पाठविली जाते. सदर रिक्वेस्ट जुन्या शाळेला स्वीकृत करावीच लागते व त्यानुसार विद्यार्थ्याला नवीन शाळेत जोडले जाते. सात दिवसांत ही रिक्वेस्ट शाळेने स्वीकृत न केल्यास ती गटशिक्षणाधिकारी यांना त्यांच्या लिंकवर दिसते. त्यावर त्यांच्याकडून संबंधित मुख्याध्यापकांना रिक्वेस्ट स्वीकृत करण्याचे निर्देश दिले जातात. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कार्यवाही होऊ शकते. गटशिक्षणाधिकारी स्वत:ही त्या विद्यार्थ्याची आॅनलाइन ट्रान्सफरची प्रक्रिया पार पाडू शकतात. त्यामुळे कोणत्याही शाळेतून काढून इतर शाळेत पाल्यास टाकण्याकरिता टीसीची आवश्यकता राहिलेली नाही. असे असताना काही पालक जुन्या शाळांकडे टीसीसाठी आग्रह धरत असून, त्यांनी टीसी न दिल्यास गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी करीत आहेत. वास्तविक एका शाळेने विद्यार्थ्याची टीसी दिली व दुसऱ्या शाळेने ती स्वीकारली तरी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी स्टुडंट पोर्टलवर जुन्याच शाळेचा विद्यार्थी म्हणून दिसेल. तो धड इकडचा नसेल व तिकडचाही नसेल. रेकॉर्डवर तो जुन्या शाळेचा असल्याने त्याची संपूर्ण जबाबदारी ही जुन्या शाळेवर येऊ शकते. त्यामुळेच आॅनलाइन प्रक्रिया पार पाडल्याशिवाय टीसी न देण्याची सावध भूमिका काही संस्थाचालक घेत आहेत.

बोगस शिक्षण संस्थांना चाप
ज्या शिक्षण संस्थांना शासनाची मान्यता नाही, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड आॅनलाइन नसतो. ते विद्यार्थ्यांची आॅनलाइन प्रवेश प्रक्रियासुद्धा पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडूनच प्रवेशासाठी टीसीचा आग्रह धरला जाऊ शकतो. याकरिता एखाद्या शाळेत केवळ टीसीच्या साहाय्याने प्रवेश दिला जात असेल, तर पालकांसाठी ती धोक्याची सूचना आहे. टीसी मागणारी संस्था अनधिकृत असू शकते व टीसीच्या साहाय्याने प्रवेश घेतल्यास घोळ होऊ शकतो, हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या अनधिकृत शिक्षण संस्थांना चाप लावणारी ठरणार आहे.

सध्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग झालेले नसून, ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शाळा सोडण्याचा दाखला प्रवेश प्रक्रियेसाठी मागितला जात आहे. शाळांनी तो पालकांना द्यावा; पण एखाद्याला असा दाखला मिळाला नाही, तरी त्याचा प्रवेश आॅनलाइन प्रक्रियेत करून घेण्यात येईल.
- जी.डी. गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती.

टीसीच्या माध्यमातून अन्य शाळेत प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्याची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया पार न पडल्यास तो विद्यार्थी स्टुडंट पोर्टलवर जुन्याच शाळेचा विद्यार्थी दिसेल. त्याची जबाबदारीही जुन्या शाळेवर येऊ शकते. त्यामुळे पालकांनी आधी आॅनलाइन प्रवेश मिळवावा व मग आवश्यकता असेल तर जुन्या शाळेकडे टीसी मागावी.
- अतिक रहेमान, अध्यक्ष, द क्रिएटर इंटरनॅशनल स्कूल

Web Title: Admission to other schools without 'TC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.