कोविड लसीकरणात खामगाव तालुक्याची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:28 PM2021-04-04T12:28:06+5:302021-04-04T12:28:30+5:30
Corona vaccination बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्याची कोविड लसीकरणात आगेकूच सुरू असल्याचे चित्र आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाकडून लसीकरणावर भर दिल्या जात आहे. लसीकरणाच्या टक्केवारीत राजस्थानला मागे टाकत, महाराष्ट्राने देशात अव्वलस्थान पटकाविले असतानाच, बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्याची कोविड लसीकरणात आगेकूच सुरू असल्याचे चित्र आहे.
बुलडाणा जिल्ह्यात विस्ताराने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा तालुका म्हणून खामगाव तालुक्याची ओळख आहे. खामगाव तालुक्याची लोकसंख्या ३ लाख २० हजारापेक्षा अधिक असून, ६० वर्षावरील नागरिकांची लोकसंख्या येथे अधिक आहे. त्याचवेळी दुर्धर व्याधी ग्रस्त रूग्णाचेही प्रमाण अधिक असल्यामुळे नियोजित १ लाख १४ हजार ३२४ जणांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करताना आरोग्य विभागाची निश्चितच दमछाक होत आहे. मात्र, तरीही अल्पकालावधीमध्ये खामगाव तालुक्याने कोविड लसीकरणात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरणावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. खामगाव तालुक्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसोबतच सामान्य रूग्णालय आणि खासगी रूग्णालयातही लसीकरणावर भर आहे. लसीकरणात खामगाव तालुक्याची वाटचाल समाधानकारक अशीच आहे.
- राजेंद्र जाधव
उपविभागीय अधिकारी,
खामगाव.