६० दिवसांनंतर पालखी शेगावात, मायभूमीत स्वागताला भाविकांचा अलोट जनसागर!
By अनिल गवई | Published: July 24, 2023 11:55 AM2023-07-24T11:55:02+5:302023-07-24T11:56:03+5:30
श्रींची पालखी पोहोचली शेगावात: पालखीसोबत असलेल्या भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत
अनिल गवई
खामगाव: विदर्भपंढरीनाथ श्री गजानन महाराजांच्या पालखीने सोमवारी पहाटेच संतनगरी शेगावकडे प्रस्थान केले. विदर्भ माउलीवर श्रध्देचा अभिषेक करताना, हजारो भाविकांनी पालखीसोबत तब्बल १७ किलोमीटर अंतराचा पायी प्रवास केला. पहाटे ५ वाजता खामगाव येथून निघालेली श्रींची पालखी सकाळी ०९:४१ वाजता शेगावात पोहोचली. यावेळी भाविकांचे एक टोक शेगावात तर दुसरे टोक खामगावात होते.त्यामुळे सोमवारी खामगाव -शेगाव पालखी मार्गावर भाविकांचा उलोट जनसागर उसळल्याचे दिसून आले.
श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीने २६ मे रोजी सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. आषाढी एकादशीला भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर असलेल्या पालखीने शेवटचा मुक्काम खामगाव येथे केला. भाविकांच्या श्रध्देचा पाहुणचार स्वीकारून सोमवारी पहाटेच श्रींची पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. श्रींची पालखी शेगाव येथे जात असतानाच, हजारो भाविकांनीही पालखी सोबत पायदळ वारी केली. अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील नव्हेतर जळगाव खांदेश, जालना आणि अमरावती येथील हजारो भाविकांनी यात सहभाग नोंदविला. आपली वाहने खामगाव येथील विविध पार्कींग ठिकाणी उभी करून पायी प्रवास केला. त्यामुळे पालखी मार्गावर केवळ भाविकांचीच अलोट गर्दी दिसून आली. प्राप्त माहितीनुसार तब्बल एक लाखाहून अधिक भाविक या वारीत सहभागी झाल्याचे समजते. शेगावच्यावेशीवर पालखी पोहोचताच गण गण गणात बोतेचा गजर करण्यात आला. श्री गजानन महाराज संस्थान आणि शेगाव येथील भाविकांच्यावतीने श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
श्रींच्या पालखींच्या ठिकठिकाणी स्वागत
श्री गजानन महाराजांच्या पालखीसोबत जाणार्या हजारो भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, नास्ता, फराळ, जेवण आणि नि:शुल्क औषध वितरणाचीही सोय उपलब्ध करण्यात आली. दिंडी मार्गांवर महिला भाविकांसाठी १८ तर पुरूषांसाठी ६ अस्थायी स्वच्छता गृहेही उभारण्यात आली. त्याचवेळी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने स्वच्छता सेवाही येथे पुरविण्यात आली.
दिंडी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त
पालखी मार्गांवर तसेच शेगावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पालखीसोबतच भाविकांच्या सुरक्षेचीही काळजी यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली.
पालखी मार्ग पालखीसाठी बंद
श्रींच्या पालखी मुळे खामगाव-शेगाव मार्गावरील वाहतूक पर्यांयी मार्गाने वळविण्यात आली होती. खामगाव-जलंब आणि खामगाव- जवळा या पर्यायी मार्गाने ही वाहतूक सुरू होती. सोमवारी दुपारी ३ वाजतापर्यंत हा मार्ग बंद होता.