दीड महिन्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस, ११ मंडळात अतिवृष्टी
By निलेश जोशी | Published: July 13, 2023 06:58 PM2023-07-13T18:58:03+5:302023-07-13T18:58:18+5:30
जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या ७६ टक्के पाऊस कमी पडलेला असतानाच पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
बुलढाणा : जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या ७६ टक्के पाऊस कमी पडलेला असतानाच पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १३ जुलै राेजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे खामगाव तालुक्यातील ढोरपगाव लगत शुद्ध गंगा नदीला आलेल्या पुरात १३ वर्षीय मुलगा वाहून गेला आहे. गाय बघण्यासाठी तो गेला होता. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच सार्वत्रिक पाऊस जिल्ह्यात पडला आहे.
यामध्ये खामगाव आणि शेगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकट्या खामगाव तालुक्यात सात आणि शेगाव तालुक्यात तीन तर मोताळा तालुक्यात एका मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. विशेष म्हणजे पडलेला हा पाऊस अपघाव पद्धतीने न पडल्यामुळे नुकसानाचेही प्रमाण कमी आहे. एकंदरीत भीज पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात रखडलेल्या ५० टक्के पेरण्यांना येत्या दोन दिवसात आता वेग येणार आहे. उडीद, मुगाच्या पेरणीसाठी असलेली ७ जुलैची विंडो आता निघून गेली असली तरी अन्य पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे. काहींनी धूळ पेरणी केली होती. त्या पिकांसाठीही योग्य वेळी हा पाऊस आल्याने शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे. परंतु जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ होण्याच्या दृष्टीनेही पावसाची गरज आहे. हा दमदार पाऊस पडला असला तरी वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात पावसाची तूट ही ९ टक्के अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत जुलै महिन्याच्या मध्यावर १५९.७ मिमी एवढा पाऊस बरसला आहे.