कोरोनानंतर आता ‘झिका’ व्हायरसचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:03+5:302021-07-18T04:25:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण तसेच म्युकरमायकोसिसबाधित सापडण्याची गती मंदावली आहे. तरी ‘झिका’ व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण तसेच म्युकरमायकोसिसबाधित सापडण्याची गती मंदावली आहे. तरी ‘झिका’ व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अद्याप झिकाचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी खबरदारीच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.
डेंग्यू, मलेरिया तसेच चिकुनगुन्यासारखाच डासाच्या चावण्याने झिकाचा प्रसार होत असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आवारात कुठे डासांची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करणे गरजेचे आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांनी सांगितले, की एडीस डासाच्या चावण्यामुळेच झिकाचा प्रसार होतो. झिकाचा एकही रुग्ण अद्याप बुलडाणा जिल्ह्यात आढळला नाही. मात्र, आरोग्य विभागाने सर्वांना या व्हायरसपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाचे नियोजन करण्यात येत आहे.
उपाययोजना काय?
कीटकजन्य आजारांना ब्रेक लावण्यासह डासांच्या उत्पत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा’ पाळणे फायद्याचे ठरते. शिवाय नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात कुठे पाणी साचत असल्यास ते वाहते करावे. लक्षणे आढळल्यास नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.
‘झिका’ या व्हायरसचा डास चावल्याने प्रसार होत असून, जागतिक आरोग्य संघटनेने अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात अद्याप झिकाचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांना खबरदारीचे उपाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
- शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.
झिकाची प्राथमिक लक्षणे - तीव्र ताप, नाक सतत वाहने, तीव्र डोकेदुखी ही झिकाची प्राथमिक लक्षणे आहेत. कुठल्याही व्यक्तीला झिकाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा.
ताप हे झिकाचे प्रमुख लक्षण असून, कुठलाही घरगुती उपाय जीवावर बेतू शकतो.
कशामुळे होतो झिका?
डेंग्यू, मलेरिया या कीटकजन्य आजारांप्रमाणेच डास चावल्यामुळे झिकाचा प्रसार होतो. ज्या डासाच्या चावल्यामुळे डेंग्यू होतो, त्याच एडीस डासाच्या चावण्यामुळे झिकाचा संसर्ग होत असल्याचे सांगण्यात आले.