मृत्युनंतरही चौघांचे जीवन केले प्रकाशमान
By Admin | Published: January 28, 2016 12:13 AM2016-01-28T00:13:15+5:302016-01-28T00:13:15+5:30
गोपाल वर्मांचे मरणोपरांत नेत्रदान.
मलकापूर (जि. बुलडाणा) : ब्रेनडेडमुळे मृत्यू झालेल्या मोताळा तालुक्यातील गोपाल वर्मा यांचे त्यांच्या कुटुंबियांनी मरणोपरांत नेत्रदान केल्यामुळे चार अंधांचे जीवन प्रकाशमान झाले आहे. मोताळा येथील रहिवासी असलेले परंतु औरंगाबाद येथे ज्वेलर्सचा व्यवसाय करणारे गोपाल भागचंद वर्मा यांचा आजारामुळे १७ जानेवारीला मृत्यू झाला. मृत्यूनंतरही त्यांचे अस्तित्व रहावे ही भावना ठेवून त्यांची पत्नी सीमा वर्मा यांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे अवयव दान करता आले नाही. परंतू त्यांच्या दोन्ही डोळ्यांनी चार अंधाचे जीवन प्रकाशमान केले आहे. चार अंध व्यक्तींना त्यामुळे सप्तरंगी दुनिया बघण्याची संधी मिळाली आहे. ब्रेनडेड मुळे औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटलमध्ये गोपाल वर्मा (४८) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्याची भूमिका त्यांची पत्नी सीमा वर्मा यांनी घेतली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने त्यांच्या गोपाल वर्मा यांच्या पार्थिवाची तपासणी केली. मात्र त्यांचे ह्रदय, किडनी हे अवयव प्रत्यारोपणासाठी तांत्रिक दृ्ष्ट्या योग्य नसल्याचा समोर आले मात्र त्यांचे डोळे हे कामात येऊ शेकतात, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यास संमती देत त्यांचे डोळे काढण्यात आले. डोळ्यांतील कॉर्नियासह अन्य काही भागाची अंधांना गरज होती. त्यानुषंगाने त्याचे रोपन करण्यात आले. त्यामुळे चार अंधांच्या जीवनात सध्या प्रकाश उजळला आहे. दरम्यान, एक डोळा किमान तीन जणांना दृष्टीदेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मलकापूर येथील गणपती नेत्ररुग्णालयाचे डॉ. विजय पाटील यांनी दिली.