महाजनादेश यात्रेपाठोपाठ आता जनआशीर्वाद यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:07 PM2019-08-26T16:07:38+5:302019-08-26T16:07:45+5:30
शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील भाग पालथा घालणार आहेत.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: १४ व्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजण्यास सुरुवात झाली असून, राजकीय पक्षांनी त्यानुषंगाने वातावरण निर्मितीस प्रारंभ केला आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दोनदा जिल्ह्यात आली; मात्र दुर्दैवाने भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाल्याने केवळ यात्रेचा सोपस्कार आटोपण्यात आला. त्यामुळे जनादेश स्वीकारण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात पुन्हा येण्याबाबत आश्वस्त केले असतानाच २९ आॅगस्ट रोजी भाजप पाठोपाठ शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील भाग पालथा घालणार आहेत.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा कयास राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. अशा स्थितीत राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघातील गाठीभेटी, बैठका तेज केल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्राही काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली होती. तीही आता पुढील टप्प्यात जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे किंवा पुढील टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात किंवा समारोप हा मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत होण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यालगतच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शिवस्वराज्य यात्रेअंतर्गत मोठी सभा झाली. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे ही सभा १९ आॅगस्ट रोजी येणे अपेक्षित होते; मात्र ती काही कारणामुळे पुढे ढकलली होती.एकंदरीत आॅगस्ट महिना हा विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण निर्मिती करणारा ठरला आहे. प्रारंभी महाजनादेश यात्रा जिल्ह्यात येऊन गेली आता शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा येऊ घातली आहे. या दोन्ही यात्रांचे वैशिष्ट्य म्हणजे महाजनादेश यात्रा ही भाजपच्या ताब्यात असलेल्या मलकापूर, खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातूनच गेली. त्या पाठोपाठ आता शिवसेनेची युवा जनआशीर्वाद यात्रा जिल्ह्यात येत असली तरी घाटावरील बुलडाणा, चिखली आणि देऊळगाव राजा मार्गे जालना जिल्ह्यात जाणार आहे. यामध्ये चिखलीचा अपवाद वगळता सिंदखेड राजात शिवसेनेचे विद्यमान आमदार आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा चार वेळा विजय झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. एकंदरीत भाजपने भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातूनच महाजनादेश यात्रा काढली तर शिवसेना ज्या मतदारसंघावर हक्क सांगत आहे, त्या मतदारसंघातूनच जनआशीर्वाद यात्रा जात आहे. परिणामी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
३१ आॅगस्टला अंतिम मतदार यादी
एकीकडे राजकीय यात्रांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच प्रशासकीय पातळीवर मतदार याद्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमही जोमात सुरू आहे. ३१ आॅगस्ट रोजी त्यानुषंगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारंभी १९ आॅगस्ट रोजी ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती; मात्र नंतर या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सध्या २ लाख ६७ हजार ते ३ लाख ९ हजारादरम्यान मतदार आहेत. अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर प्रत्यक्षात मतदारसंघनिहाय किती उमेदवार आहेत, हे स्पष्ट होईल.