मार्च एन्ड नंतर बीएसएनएल सेवेलाही ‘विघ्न’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:44 PM2019-04-08T12:44:35+5:302019-04-08T12:45:14+5:30
बुलडाणा: मार्च एन्ड संपल्यापासून बीएसएनएल सेवेलाही विघ्न लागल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून येते. १ एप्रिल पासून येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत.
बुलडाणा: मार्च एन्ड संपल्यापासून बीएसएनएल सेवेलाही विघ्न लागल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून येते. १ एप्रिल पासून येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत.
गेल्या सात दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असून बँकेशी संबंधित ग्राहकांसह इतरांनाही याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे बँकेसह इतर ठिकाणच्या कामांनाही ब्रेक लागला आहे. जिल्हाभर बीएसएनएलचे जाळे पसरले असून शासकीय, निमशासकीय कार्यालयांतही बीएसएनएल सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, बीएसएनएलची सेवा वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांसोबतच बँक आणि शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. बीएसएनएल सेवा कधी सुरळीत होणार, असा प्रश्न या विभागातील अधिकाऱ्यांना केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण आहे. बीएसएनएलची सेवा सुरूळीत करण्यासाठी प्रशासनाची दिरंगाई मोठे नुकसान करत आहे. शहरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार ग्राहकांसाठी नवीन नाहीत. कधी नगरपालिकेचे खोदकाम, तर कधी बीएसएनएलच्या केबल तुटल्याने ही सेवा सतत बंद पडते. सध्या जिल्हाभर रस्त्याची कामे सुरू असल्याने बीएसएनएलची सेवा विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपासून जिल्ह्यातील इंटरनेट बंद असल्याने बँकेचे व्यवहारही ठप्प होत आहेत. अन्य कार्यालयांतील आॅनलाईन कामकाज बंद झाल्याने नागरिकांची गरसोय होत आहे.
मार्च एन्ड नंतर बीएसएनएल सेवेलाही ‘विघ्न’!
बँकामध्ये वाढल्या अडचणी
आतापर्यंत बँकामध्ये मार्च एन्डीगची कामे सुरू होती. त्यामुळे ग्राहकांचे अनेक व्यवहार थांबले होते. परंतू मार्च एन्डींग संपताच बँकामधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने पुन्हा बँकेत ग्राहकांची कामे लांबणीवर पडत आहेत.
रस्ता कामाचा खोडा
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत. या रस्त्याच्या कामासाठी होत असलेल्या खोदकामामुळे बीएसएनएलचे केबल तुटत आहेत. बीएसएनएलची केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा बंद पडते. खोदकाम चालू असताना या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे थांबणे आवश्यक असताना केबल तुटल्यानंतरही त्याची दुरूस्ती केल्या जात नाही. त्यामुळे अनेक दिवस बीएसएनएलची सेवा विस्कळीत राहते.