दीड महिन्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील ५०१ मजूर उत्तरप्रदेश साठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:20 AM2020-05-07T11:20:51+5:302020-05-07T11:20:58+5:30
भुसावळ रेल्वे स्टेशनमधून श्रमजिवी एक्सप्रेसने त्यांची पाऊले घराकडे वळाली.
बुलडाणा : लॉकडाउनमध्ये तब्बल दीड महिन्यापासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील निवारा केंद्रात ठेवलेल्या उत्तरप्रदेशमधील ५०१ मजुरांना बुधवारी प्रशासनाने रवाना केले. भुसावळ रेल्वे स्टेशनमधून श्रमजिवी एक्सप्रेसने त्यांची पाऊले घराकडे वळाली.
कोरानो विषाणूचा शिरकाव देशात झाल्याचे लक्षात येताच भविष्याचा वेध घेत केंद्र शासनाने देशात २४ मार्चपासून लॉकडाउन सुरू केले. प्रशासनाकडून त्याची कडक अंमलबजावणीही करण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे राज्यात असलेले परप्रांतीय मजूर अडकून पडले. राज्य शासनाने स्थलांतरीत व अडकून पडलेल्या मजूरांची निवास, भोजनाची मोफत व्यवस्था केली. पायी घराची वाट धरणाºया मजूरांना प्रशासनाने निवारा केंद्रांमध्ये ठेवले. भोजन, निवासासह समुपदेशन, आरोग्य तपासणी व मनोरंजनाची व्यवस्थाही करण्यात आली.
उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत ५०१ मजुरांना प्रशासनाने मोफत त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी बुधवारी भुसावळ रेल्वे स्टेशनवर पोहोचविले. तेथून विशेष श्रमजीवी रेल्वे लखनऊसाठी सायंकाळी ६ वाजता सुटली. या रेल्वेमध्ये जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांतील मजुरांसह बुलडाणा जिल्ह्यातील ५०१ मजूर लखनऊसाठी रवाना झाले. ही रेल्वे लखनऊ येथे सात मे रोजी सकाळी ८ वाजता पोहोचणार आहे. निवारा केंद्रामध्ये केलेल्या व्यवस्थेबद्दल मजूरांनी प्रशासनाचे धन्यवाद मानले. भुसावळ रेल्वे स्टेशनवर जिल्ह्यातील महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी त्या मजुरांना त्यांच्या गावाकडे रवाना करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते. रेल्वे सुटण्यावेळी अधिकारी व कर्मचाºयांनी मजुरांना टाळ्या वाजवून आनंदाने भावपूर्ण निरोप दिला. घराची ओढ लागलेल्या काही मजुरांच्या द्वयनेत्रात आनंदाश्रूही तरळले तर काहींच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता.