साडेतीन महिन्यानंतर अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:00 PM2021-07-22T12:00:54+5:302021-07-22T12:01:17+5:30
Crop Loan : एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: खरीप हंगामामध्ये बँकांना पीक कर्जापोटी दिलेल्या उदिष्टाच्या अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे. गेल्या साडेतीन महिन्यापासून पीक कर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. मात्र बँकांनी जिल्ह्यास दिलेल्या एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच ३१ जुलै पीक कर्ज वाटपाची अखेरची मुदत आहे.
त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपाचा टक्का आता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच जिल्हयात जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास ७ टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या तर काही भागात पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती.
आता जिल्हयात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या तरी पीक कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी उसणार करून पेरणी केली आहे. परिणामी किमानपक्षी शेतकऱ्यांना आता तरी पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
बुलडाणा जिल्ह्याती बँकांना यंदाच्या खरीप १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. यापैकी २१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ६५ हजार ८०४ शेतकऱ्यांना ५६९ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण उदिष्टाच्या ते ४४ टक्के आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १ हजार कोटींनी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट कमी झाले आहे. त्या उपरही पीक कर्जाचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे येत्या काळात बँकांना हा टक्का वाढवावा लागणार आहे. प्रसंगी ३० सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज वाटप केले जाऊ शकते.