ग्रामपंचायतच्या निधीतून सिमेंट रस्त्यांचे काम बाद
By admin | Published: February 15, 2016 02:28 AM2016-02-15T02:28:10+5:302016-02-15T02:28:10+5:30
दोन टप्प्यांत हा निधी ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा झाला.
बुलडाणा : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाचा थेट ग्रामपंचायतींना निधी मिळाला असून, दोन टप्प्यांत हा निधी ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा झाला आहे. या निधीच्या वितरणाबद्दल मार्गदर्शन झाले नसल्याने कामे रखडली होती. मात्र, जिल्हा परिषदेला आता नव्याने मार्गदर्शन प्राप्त झाल्याने निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निधीतून सिमेंट रस्ते वगळण्यात आल्याने, आता गावातील रस्ते विकासाला खिळ बसणार आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या देण्यात येणार्या निधीतून ग्रामपंचायतींना सिमेंट रस्त्याचे काम यापुढे करता येणार नाही. प्राप्त निधीतून करण्यात येणार्या कामांचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे. यात पाणीपुरवठा स्रोतांच्या बळकटीवर अधिक भर देण्यात आला आहे. एकूण निधीच्या ९0 टक्के निधी खर्च करता येईल. उर्वरित १0 टक्के निधी ग्रामपंचायतीच्या खर्चासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्यावर भर देण्यात आला आहे.