दीड वर्षानंतर १९५ शाळांची वाजली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:06+5:302021-07-17T04:27:06+5:30
बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे गत दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १९५ शाळांमध्ये १५ जुलै राेजी घंटी वाजली. काेराेनामुक्त गावांमध्ये ...
बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे गत दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १९५ शाळांमध्ये १५ जुलै राेजी घंटी वाजली. काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गत महिनाभरात एकही काेराेना रुग्ण न आढळलेल्या गावात शाळा सुरू झाल्या आहेत.
काेराेना संसर्ग वाढत असल्याने गत वर्षांपासून शाळा बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेंतर्गत काेराेनामुळे गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी गावातील ग्रामपंचायतींचा ठराव घेण्याचे तसेच पालकांचे संमतीपत्र घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १९५ गावांनी प्रस्ताव दिल्याने या गावांमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून या शाळा सुरू करणयात आल्या. तेराही पंचायत समित्यांचे सभापती, गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत या शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागताने सुरू करण्यात आल्या हाेत्या.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरातच हाेते. गुरुवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हाेता. जिल्हाभरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी ३ हजार ९४० विद्यार्थ्यांची उपस्थिती हाेती. ही उपस्थिती येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. तसेच सुरू करण्यात येणाऱ्या शाळांची संख्याही वाढणार आहे़
जिल्ह्यात १,१०३ आठवीच्या शाळा
जिल्ह्यात खासगी व जिल्हा परिषदेच्या आठवीच्या शाळांची संख्या १,१०३ इतकी आहे. यामध्ये बुलडाणा १४८, चिखली १४३, खामगाव १४२, देऊळगावराजा ६५, मोताळा ६४, लोणार ६८, मलकापूर ४९, जळगाव जामोद ७२, नांदुरा ६४, संग्रामपूर ४५, शेगाव ६७, सिंदखेड राजा तालुक्यातील ७१ शाळांचा समावेश आहे़
ग्रामस्तरावरील समिती घेणार शाळेचा निर्णय
काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू करायची किंवा नाही याचा निर्णय ग्राम स्तरावरील समिती घेणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच तर सदस्यपदी तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्राम सेवक सदस्य सचिव, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आदींचा समावेश आहे़
शिक्षकांच्या काेराेना चाचण्या
शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या काेराेना चाचण्या करण्यात आल्या आहेत. पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश बंदी आहे. विद्यार्थी कोविडग्रस्त आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून निर्जंतुकीकरणाचे आदेश देण्यात आले आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर, टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे.