स्वस्त धान्याच्या माहितीसाठी पुन्हा एसएमएस सुविधा
By admin | Published: August 11, 2015 11:27 PM2015-08-11T23:27:20+5:302015-08-11T23:27:20+5:30
मेहकर तालुक्यात रेशन मालाच्या माहितीसाठी गावागावांत राबविणार एसएमएस सुविधा.
उद्धव फंगाळ /मेहकर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वस्त धान्याच्या मालाचे वाटपच होत नसल्याच्या तक्रारी नेहमीच होत असतात. काही स्वस्त धान्य दुकानदार धान्याची काळाबाजारात विक्री करीत असल्याचे प्रकारही उघड होत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित राहत असल्याचा प्रकार थांबविण्यासाठी मेहकर तालुक्यात स्वस्त धान्याच्या माहितीसाठी पुन्हा एसएमएस सुविधा राबविण्यात येणार आहे. काही काळासाठी बंद असलेली एसएमएस योजना अन्न पुरवठा अधिकारी सतीश काळे यांनी पुन्हा सुरू करण्याचे आदेश संबंधित कर्मचार्यांना १0 ऑगस्ट रोजी दिले आहेत. स्वस्त धान्य दुकान अंतर्गत विविध योजना सुरु केल्या असून, त्या योजनांद्वारे लाभार्थ्यांना अल्पदरात अन्नधान्याचे वाटप करण्यात येते; मात्र हे अन्नधान्य संबंधित गावातील लाभार्थ्याला वाटप न करता तसेच दोन-दोन महिन्याचा मालाचा कोटा गायब करुन काळाबाजारात त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे गावागावांतील गरीब लाभार्थी रेशनच्या मालापासून वंचित राहतात. मेहकर व डोणगाव या ठिकाणच्या शासकीय गोडाउनमधून मेहकर तालुक्यात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो.