अकोला-खंडवा रेल्वेमार्ग बुलडाणा जिल्ह्यातून वळविण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 07:25 PM2020-08-09T19:25:44+5:302020-08-09T19:25:53+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारखेड-सगोडा फाट्यावर रविवार ९ आॅगस्ट क्रांती दिनी सकाळी आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा असलेला अकोला-खंडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारखेड-सगोडा फाट्यावर रविवार ९ आॅगस्ट क्रांती दिनी सकाळी आंदोलन करण्यात आले. अकोला-खंडवा रेल्वे मार्गात अकोट ते अमला खुर्द ७७ कि. मी., अमला खुर्द ते खंडवा ५४ कि. मी. असे हे काम होत आहे. अकोट पर्यंतचे काम पूर्ण झाले. मात्र अकोट ते अमला खुर्द हा ३५ कि. मी. चा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने वादात आहे.
गेल्या अनेक दिवसापासून या प्रकल्पाला विरोध होत आहे. ३५ पैकी १८ किमीचा मार्ग हा व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्यामुळे या भागातून गेज परिवर्तनाला पर्यावरणवादी, निसर्ग मित्र, वन्यजीव प्रेमी, विविध संस्थांकडून विरोध होत आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा रेल्वे मार्ग रद्द करून अकोट, हिवरखेड, सोनाळा, जामोद मार्गे खंडवा करण्याची मागणी करण्यात आली.
केंद्र शासनाने व्याघ्र प्रकल्पातून रेल्वे मार्ग काढल्यास वन्यजीव धोक्यात येणार आहेत. त्यामुळेच रेल्वे मार्ग व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेरून करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सगोडा-वारखेड फाट्यावरील आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळघाटातील वाघांचे अधिवास सुरक्षित राहील
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून रेल्वे गेज परिवर्तनाचे काम केल्यास वन्यजीव व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. जैव विविधता व जंगलाचे संरक्षण व संवर्धन होईल. पर्यायी मार्गाने २ लाखापेक्षाही अधिक प्रवाशांचा फायदा होणार आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तर बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जा. तालुक्यासाठी हा रेल्वे मार्ग वरदान ठरेल. या दुर्गम भागातील असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मागासलेल्या भागात विकासाला चालना मिळणार आहे.