कृषी सेवा महासंघाचे बुलढाण्यात आंदोलन; वेतन निवारण समितीची भूमिका अन्यायकारक
By ब्रह्मानंद जाधव | Published: March 3, 2023 05:02 PM2023-03-03T17:02:43+5:302023-03-03T17:02:57+5:30
के. पी. बक्षी वेतन त्रुटी निवारण समितीने कृषी विभागावर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
बुलढाणा : के. पी. बक्षी वेतन त्रुटी निवारण समितीने कृषी विभागावर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच घोषणाबाजीही केली.
कृषी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधीकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनी निवेदन पाठविले आहे. के. पी. बक्षी यांचे अध्यक्षतेखाली स्थापित सातवा वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी निवारण समितीने कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतन त्रुटी बाबत अन्यायकारक भूमिका घेतल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
कृषी विभागातील तांत्रिक संवर्गाची समकक्षता इतर विभागातील तांत्रिक, व्यावसायिक (वैद्यकीय, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी) संवर्गाशी प्रस्थापित करुन, तालुका कृषी अधिकारी संवर्गास उपअभियंता, पशुवैद्यकीय अधिकारी, वैद्यकिय अधिकाऱ्यांचे प्रमाने नियमित वर्ग एक दर्जा व वेतन श्रेणी देण्यात यावी, भविष्यात एमपीएससीद्वारे फक्त तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी ही दोनच पदे भरण्यात यावी, महानगरपालिका क्षेत्रात शेतकऱ्यांचा शेतीमाल विपणनच्या दृष्टीने 'स्वतंत्र चमू' निर्माण करण्यात येवून केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी निती आयोगाच्याच्या शिफारशीनुसार नेमलेल्या डीएफआय कमिटीने खंड ११ मध्ये नमुद केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, कृषी विभागाच्या मंजूर पद संख्येत कपात न करता पदोन्नतीच्या किमान दोन संधी देणारा सुधारित आकृतीबंध तयार करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत.
वर्ग एक संघटनेचे संतोष डाबरे, विजय बेटीवार, वर्ग दोन संघटनेचे ज्ञानेश्वर सवडतकर, अशोक सुरडकर, बिपीन राठोड, पुरूषोत्तम अंगाईत, वर्ग दोन क. संघटनेचे उमेश जाधव, मयुरी खलाने, सतीष दांडगे, कपील चिंगळे, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे विष्णू डुकरे, धनंजय सोनुने, संजय अंभोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.