पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:38+5:302021-06-10T04:23:38+5:30
कोरोना काळात व लॉकडॉऊनमुळे सद्य:स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्जाच्या माध्यमातून आधार देणे आवश्यक आहे. ...
कोरोना काळात व लॉकडॉऊनमुळे सद्य:स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्जाच्या माध्यमातून आधार देणे आवश्यक आहे. खरीप हंगाम सुरू झाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात चांंगला होत आहे. त्यामुळे शेतकरी जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे बँकांनी आता पीक कर्जवाटपाची गती वाढवावी. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, शेतकऱ्यांना बँकेच्या दारात ताटकळत उभे ठेऊ नये, बँकांनी पीक कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती शाखेच्या दर्शनीभागात फलकावर किंवा बॅनरवर लावावी. जेणेकरून शेतकऱ्यांना कागदपत्रांची माहिती होईल. बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करताना उद्धट वागणूक देऊ नये. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मदत करावी. खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना खते, बी बियाणे आदी कृषी निविष्ठा खरेदीसाठी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून या महामारीच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यात यावा, शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी पीककर्ज न दिल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंकुर देशपांडे यांनी दिला आहे. निवेदन देण्यासाठी भाजप तालुका उपाध्यक्ष गोपाल बाजड, योगेश नन्हई, अनिकेत इंगळे, गजानन पंचाळ, अभय वाघ, संग्रामसिंग, अनिल चांगाडे, जालमसिंग ठाकूर, रवींद्र जगताप, हर्षल खरात, गोपाल शिराळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.