केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी न केल्यास आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:49+5:302021-05-20T04:37:49+5:30
चिखली : खरीप हंगाम जवळ आलेल्या असताना केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे ...
चिखली : खरीप हंगाम जवळ आलेल्या असताना केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असून केंद्र सरकारने खतांच्या किमती तातडीने कमी कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना व युवासेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात कोरोनामुळे आधीच शेतकरी विवंचनेत साडपलेला असताना ऐन हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तसेच डिझेलच्या किमतीतही वाढ झालेली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीच्या कामाचे नियोजन कोलमडले आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत करताना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पावले उचलून खते व डिझेलचे भाव तातडीने कमी करावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना नेते प्रा.नरेंद्र खेडेकर, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, प्रीतम गैची, बाजार समितीचे संचालक गजानन पवार, नगरसेवक दत्ता सुसर, विलास घोलप, मनोज वाघमारे, समाधान जाधव, शाम शिंगणे, आनंद गैची, रवि पेटकर, बन्टी कपूर, शुभम खरपास, विशाल इंगळे, हरी इंगळे, पप्पू परिहार आदींची स्वाक्षरी आहे़