बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 03:00 PM2018-07-26T15:00:01+5:302018-07-26T15:10:49+5:30
कामगंध सापळे लावण्याचे कृषी विभागाचे आवाहन
बुलडाणा : कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाकडून राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहीम राबविण्यात येते. मात्र या मोहीमेचा अहवाल कृषी आयुक्तालयांकडे पाठविण्यास टाळाटाळ होत असल्याने २४ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेलाच ‘कीड’! असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेला सुरूवात झाली असून कपाशी शेतात व जिनिंगमध्ये कामगंध सापळे लावण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कापूस पिकाची पेरणी सर्वसाधारणपणे ५ जून २०१८ पासुन सुरू झालेली आहे. या कापूस पिकाचा पेरा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाच्या आगमनाच्या अनुषंगाने झालेला आहे. कापूस पिकाची सद्यस्थिती चार पानांच्या वाढीव अवस्थेपासून फुलकळी सुटण्यापर्यंत आहे. साधारणपणे ४० दिवसानंतर फुलकळीस (पातीस) सुरूवात होते. याच काळात शेंदरी बोंडअळीचे पतंग फुलकळीच्या देठावर अंडी घालतात. शेंदरी बोंडअळीचे पतंगांना कापूस पिकावरील बोंडाचे देठ हे एकमेव अंडी घालण्याचे ठिकाण असून अन्यत्र अंडी घातली जात नाही. या परिस्थितीत कापूस पिकावर आलेल्या फुलकळीच्या देठावर अंडी घालण्यास प्रतिबंध केल्यास शेंदरी बोंडअळी नियंत्रणात येऊ शकते. त्यासाठी राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तीन वेळा या मोहीमेचा अहवाल कृषी आयुक्तांयाकडे मागूनही दिल्या गेला नाही. त्यामुळे ‘लोकमत’मध्ये राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेलाच ‘कीड’! असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची कृषी विभागाने दखल घेवून बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शेतकऱ्यांनी प्रति एकर दोन कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स, ल्युअर्स) याप्रमाणे लावावी, जिनिंग व ऑईल मिल परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी एकरी दोन ऐवजी पाच फेरोमन सापळे लावावी, कापसाच्या जिनिंग व सरकीच्या ऑईल मिल यांनी ३० बाय ३० मीटरवर एक याप्रमाणे शेंदरी बोंडअळीचे फेरोमन ल्युअर्स सात ते आठ फुट उंचीवर लावण्यात यावेत. जिनिंग व ऑईल मिल मालकांनी सरकीच्या असलेला साठा ताडपत्रीने झाकून क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस यांची फवारणी करावी. ऑईल मिल परिसर सरकीमुक्त ठेवण्यात यावा. पावसामुळे ऑईल मिल परिसरात सरकी पडल्यामुळे कापसाचे रोपे उगवून आली असल्यास ती नष्ट करावी. कोणत्याही प्रकारचे सरकी व कापसाचे अवशेष बाहेर न टाकता नष्ट करावीत अशा सुचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिल्या आहेत.
असे करा उपाय
फेरोमन सापळ्यामध्ये प्रति दिवशी सात ते आठ पतंग सापडल्यास क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लीटर पाण्यात किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के २० ग्रॅम १० लिटर पाण्यात किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के २५ मिली प्रति १० लीटर फवारणी सायंकाळी ५ वाजेनंतर करावी. प्रतिबंध उपाय म्हणून ३५ ते ४० दिवसाचे पीक झाल्यावर पाती अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी सायंकाळी ५ वाजेनंतर करावी. तसेच निंबोळी अर्काची दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १० ते १२ दिवसांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.