शेतीचा वाद विकोपाला; सख्ख्या पुतण्याने काकाच्या अंगावर घातले ट्रॅक्टर
By निलेश जोशी | Published: June 6, 2024 09:28 PM2024-06-06T21:28:26+5:302024-06-06T21:28:46+5:30
चिखली : शेतीचा वाटा-हिश्शावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद विकोपाला गेला अन् सख्ख्या पुतण्याने काकावर ट्रॅक्टर चालवून त्यांचा खून ...
चिखली : शेतीचा वाटा-हिश्शावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद विकोपाला गेला अन् सख्ख्या पुतण्याने काकावर ट्रॅक्टर चालवून त्यांचा खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे ६ जूनला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. जनार्धन तुकाराम जोशी असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे जनार्धन तुकाराम जोशी व उत्तम तुकाराम जोशी या दोन सख्ख्या भावांमध्ये वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटा-हिश्शावरून पूर्वीपासून वाद आहे. या वादाने अमडापूर पोलिस स्टेशनसह दिवाणी न्यायालयाची पायरी यापूर्वीच ओलांडलेली आहे. दरम्यान, ६ जून रोजी शेतकरी जनार्धन जोशी यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतात या प्रकरणातील संशयित व मृतकाचा पुतण्या समाधान उत्तम जोशी हा ट्रॅक्टरने वखरणी करण्यासाठी आला असता त्यास जनार्धन जोशी यांनी विरोध केला. यावरून बाचाबाची झाल्याने पुतण्याने थेट आपल्या काकावरच ट्रॅक्टर घातल्याने जनार्धन जोशींचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. घटनास्थळी अमडापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन पाटील, पीएसआय इंगळे, एएसआय टेकाळे सहकाऱ्यांसह दाखल झाले होते. पंचनाम्याअंती मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान, वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी अमडापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो.