शेतजमीनीचा पोत बिघडला; बुलडाणा जिल्ह्यात एकरी उत्पादनात निम्म्याने घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 02:03 PM2018-12-07T14:03:53+5:302018-12-07T14:04:17+5:30
बुलडाणा: सातत्यपूर्ण आवर्षण सदृश्य स्थिती, वाढत्या रासायनिक खतांचा वापर व अन्य तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेती उपयुक्त जमिनीचा पोत खराब झाल्यामुळे प्रमुख पिकांचे जिल्ह्यातील एकरी उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे वास्तव आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: सातत्यपूर्ण आवर्षण सदृश्य स्थिती, वाढत्या रासायनिक खतांचा वापर व अन्य तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेती उपयुक्त जमिनीचा पोत खराब झाल्यामुळे प्रमुख पिकांचे जिल्ह्यातील एकरी उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे वास्तव आहे. एकीकडे दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी असातानाच शेतजमीनीचा पोत बिघडण्याची समस्या शेतकºयांसमोर उभी ठाकली आहे. त्यातच २९ हजार हेक्टर क्षेत्रावरील क्षारयुक्त चोपण जमीनीची समस्या ही वेगळीच आहे. आलीकडच्या काळात पीक उत्पादनाचा आलेख खाली आलेला आहे. जिल्ह्यात प्रमुख पीक असलेले सोयाबीन काही वर्षापूर्वी एकरी दहा क्विंटलच्यावर होत होते. मात्र आता एक एकर शेतामध्ये सोयाबीन अवघे पाच क्विंटलपर्यंत होत असल्याचे चित्र आहे. जमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादनवाढीस उपयुक्त ठरतात. जास्त उत्पादनाच्या आशेपोटी काही वर्षांपासून शेती व्यवसायातुन महत्तम उत्पादन मिळविण्यासाठी रासायानिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमिन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर, जमीनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. यामुळे पिकाची खुंटलेली वाढ, उत्पादनाचे गुणामध्ये घट, जमिनी नापीकी होणे, समस्याग्रस्त क्षेत्रांमध्ये वाढ, उत्पादनात घट होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मृदा ही काळी, कसदार आढळते. जमिनीची उत्पादकता ही १६ घटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. मुख्य अन्नद्रव्यामध्ये उपलब्ध असलेले नत्र हा घटक जिल्ह्यातील जमिनीच्या आरोग्यामध्ये कमी झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील १३ तालुक्याच्या जमिनीत नत्राचा अभाव आहे. तर सर्वसाधारण घटकांमध्ये येणारा सेंद्रीय कर्ब (ओसी) हा घटक खामगाव, जळगाव जामोद, मेहकर, लोणार व सिंदखेड राजा तालुक्यातील जमिनीमध्ये कमी झाला आहे. स्फुरद हा घटक खामगाव तालुक्यातील जमिनीत कमी झाला आहे. जस्ताचे प्रमाण मलकापूर व नांदुरा तालुका वगळता सर्वच तालुक्यात कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक उत्पादनावर परिणाम होत आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात मृद नमुने तपासणी करून शेतकºयांना आरोग्य पत्रिका दिल्या जातात. जिल्ह्यात जमिन आरोग्य व सुपिकता व्यवस्थापन यावर शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी गायकवाड यांनी दिली
घाटाखाली लोहाचे प्रमाण कमी
घाटाखालील भागात येणाºया जमिनीमध्ये लोह हा घटक कमी झाल्याचे दिसून येते. त्यात मोताळा, मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यांबरोबर बुलडाण्याचाही समावेश आहे. जमिनीत सुक्ष्म मुलद्रव्य जस्त व लोहाची सर्वसाधारण कमतरता असल्याने शेतकºयांनी झिंक सल्फेट २० ते २५ किलो प्रतिहेक्टर व फेरस सल्फेट २० ते २५ किलो प्रति हेक्टर जमिनीतुन किंवा ०.५० टक्के झिंक व ०.५० ते १.० फेरस सल्फेट फवारणीतून द्यावे, अशा सुचना जिल्हा मृद सेर्वेक्षण मृद चाचणी अधिकाºयांनी दिल्या आहेत.
२१ हजार २७ नमुन्यांची तपासणी
मृद नमुन्यांची तपासणी करून मृद आरोग्य ठरविले जाते. त्यानुसार जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७०१ गावांमधून ४३ हजार ५३१ नमुने तपासण्यात आले होते. तर यावर्षी २०१८-१९ मध्ये ७५८ गावांमधून २१ हजार ५७ मृद नमुने तपासण्यात आले आहेत.