कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार ‘आॅफलाइन’च!
By admin | Published: July 3, 2017 01:00 AM2017-07-03T01:00:27+5:302017-07-03T01:22:04+5:30
दोन बाजार समित्यांमध्ये संगणकीकृत पद्धत : बाजार समित्या आॅनलाइनपासून दूर
ब्रह्मानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी शासनाच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती आॅनलाइन करण्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चिखली व मेहकर येथील बाजार समित्या संगणकीकृत झाल्या आहेत. मात्र, चिखली, मेहकरसह जिल्ह्यातील सर्वच कृउबासचा कारभार हा ‘आॅफलाइन’च चालत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामामध्ये पारदर्शकता यावी, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचावे, यासाठी आॅनलाइन प्लॅटफार्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत सुरुवातीला राज्यातील पाच बाजार समित्या संगणकीकृत पद्धतीने आॅनलाइन करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश आहे. चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वर्षभरापूर्वीच आॅनलाइन करण्यात आली. त्यानंतर राज्यातील २० बाजार समित्यांमध्ये संगणकीकृत पद्धतीची कार्यवाही करण्यात आली. या बाजार समित्यांमध्ये इन गेट एन्ट्री (प्रवेश), वजन, लिलाव, देयक व आउट गेट एन्ट्री संगणकीकृत पद्धतीची कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्येसुद्धा जिल्ह्यातील मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील चिखली व मेहकर येथील दोन बाजार समित्यांचा कारभार संगणकीकृत पद्धतीने आॅनलाइन करण्यात आला. बाजार समित्यांमधील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व अडते यांना लिलाव पद्धती प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर आता पुढच्या टप्प्यात देऊळगाव राजा व खामगाव येथील बाजार समित्यांनाही आॅनलाइन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील एकाही बाजार समितीमध्ये आॅनलाइन कारभार सुरू नाही. चिखली व मेहकर येथील बाजार समिती आॅनलाइन करूनही येथे शेतमालाचा लिलाव पारंपरिक पद्धतीनेच करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समित्या आॅनलाइन करण्याचा आग्रह धरण्यात येत असतानाही जिल्ह्यातील बाजार समित्या आॅनलाइन प्रणालीपासून दूरच आहेत.
जिल्ह्यातील चार बाजार समित्या होणार आॅनलाइन!
राज्यात ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्याद्वारे धान्य, फळे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. ह्या सर्व बाजार समित्यांचा कारभार आॅनलाइन करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी चार बाजार समित्या आॅनलाइन प्लॅटफार्मवर आहेत. त्यामध्ये चिखली व मेहकर येथील बाजार समित्यांमध्ये संगणकीकृत साहित्य बसविण्यात आले असून, खामगाव व देऊळगाव राजा बाजार समित्या प्रतीक्षेत आहेत.
मेहकर बाजार समितीला इंटरनेटची प्रतीक्षा
जिल्ह्यातील चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आॅनलाइन होऊन वर्ष उलटले. तसेच मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचेसुद्धा संगणकीकृत साहित्य बसवून आॅनलाइन प्रणालीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, ज्या बाजार समित्या आॅनलाइन झाल्या, त्यांचा कारभार सध्या आॅफलाइनच आहे. मेहकर येथील बाजार समितीमध्ये संगणकीकृत कार्यवाही आटोपली असतानाही येथे इंटरनेट सुविधेची प्रतीक्षा आहे. मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इंटरनेट सुविधेचा खोडा निर्माण झाल्याने येथील कामकाज आॅफलाइन आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगणकीकृत पद्धतीने आॅनलाइन प्रणालीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाजार समितीमध्ये बीएसएनएल इंटरनेट सुविधेसाठी मागणी करण्यात आली असून, इंटरनेट उपलब्ध होताच बाजार समितीचा सर्व कारभार आॅनलाइन सुरू होईल.
- माधवराव जाधव,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मेहकर.
चिखली व मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगणकीकृत पद्धतीने आॅनलाइन प्रणाली उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच इतर बाजार समित्या टप्प्या-टप्प्याने संगणकीकृत करून तेथील कारभार आॅनलाइन सुरू होईल.
- आर. के. जुनघरे, सहायक व्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय, अमरावती.