लष्करी अळी व्यवस्थापनावर कृषी शास्त्रज्ञांचे विचार मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:15 PM2019-08-28T16:15:42+5:302019-08-28T16:16:01+5:30
ळाव्यात मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थानावर विचार मंथन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापन जागृती अभियान अंतर्गत सोमवारी बुलडाण्यात शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थानावर विचार मंथन झाले.
या कार्यक्रमास दक्षिण एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, दक्षिण एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्लीचे संचालक डॉ. भागीरथ चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील संशोधन संचालक, डॉ. विलास खर्चे, डॉ. दिलीप मानकर, डॉ. धनराज उंदिरवाडे, संतोष डाबरे, डॉ. चंद्रकांत जायभाये, डॉ. दिनेश कानवडे, डॉ. सतीश जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पंदेकृवी अकोलाचे संशोधन संचालक अकोला डॉ. विलास खर्चे यांनी आपल्या प्रस्तावनापर मार्गदर्शनामध्ये या कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करीत मका पिकावरील नवीन लष्करी अळी नियोजनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापिठ कीटकशास्त्रज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हि कीड नियंत्रणात ठेवण्यात शेतकऱ्यांना यश मिळते आहे, याबाबत समाधान व्यक्त केले. दक्षिण एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे नमूद केले. यावेळी संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी मका पिकाचे औद्यागिक, मनुष्य आहार, पशु खाद्य, कोंबडी खाद्य, सौंदर्य प्रसाधन या दृष्टीने महत्त्व विषद केले. हे एक आंतरराष्ट्रीय पिक आहे आणि त्याचे लष्करी अळीपासून संरक्षणासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा वापर करावा, असे आवाहन केले. डॉ. सी. डी. मायी यांनी आपल्या लष्करी अळीचा शिरकाव आणि तिच्या नियंत्रणासाठी सर्जिकल स्ट्राईक करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
कामगंध सापळ्यावर भर देणे आवश्यक
डॉ. भागीरथ चौधरी यांनी मक्यावरील लष्करी अळीचा जीवनक्रम नियंत्रणासाठी बीज प्रक्रियापासून वापरण्यात येणारे वेगवेगळ्या शिफारसीत कीटकनाशके त्याची कार्यपद्धती, कीटकनाशकाच्या फवारणीच्या वेळा व पद्धती, सुरक्षित कीटकनाशक हाताळणी व वापर, एकत्मिक कीड व्यवस्थापनेचे महत्त्व सांगितले. कामगंध सापळे तसेच रासायनिक कीटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी संरक्षक गॉगल्स, मास्क, हातमोजे या बद्दल माहिती दिली.