तलाव फुटल्यामुळे ५ हजार हेक्टरवरील शेती खरडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 10:19 AM2021-06-30T10:19:26+5:302021-06-30T10:19:46+5:30
Agriculture on 5,000 hectares was scrapped : नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसिलादर अजितकुमार येळे यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यात दि. २८ जून रोजी धुमाकूळ घालणाऱ्या पावसामुळे अवघ्या दोन तासांत नदी, नाले ओसंडून वाहू लागल्यामुळे तथा आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील पाच हजार हेक्टरवरील शेत जमीनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये ७५ विहीरींचेही नुकसान झाले. नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसिलादर अजितकुमार येळे यांनी दिले आहेत.
मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने नंतर उघडीप दिली होती; मात्र दि. २८ जून रोजी झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गांगलगांव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली. अंबाशी, आमखेड, येवता, खैरव, एकलारा, पाटोदा गावात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे आमखेड पाझरतलावाची भिंत फुटल्याने जनजीवनही विस्कळीत झाले होते. दुसरीकडे कोराडी नदीला पूर आल्यामुळे अंबाशी गावातील बहुतांश नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाण्यांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
चिखली तालुक्यातील कोलारा, बेराळा, भालगाव, येवता, गांगलगाव, खैरव, आमखेड, एकलारा, तेल्हारा, काटोड्यात ढगफुटी सदृश्य चित्र होते. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.