बोगस तणनाशक फवारणीने कृषी विभागात गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 02:40 PM2019-07-27T14:40:48+5:302019-07-27T14:41:08+5:30
कृषी मंत्री खोत यांनी बोगस तणनाशक प्रकरणी जिल्ह्यातील तीन कृषी केंद्र चालकांवर निलंबनाची कारवाई केली. परंतू या कारवाईने आता, कृषी विभागाच्या वुर्तळात गोंधळ उडाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: तणनाशक फवारणीमुळे पिके करपल्याच्या घटना जिल्ह्यात गत आठवड्यामध्ये समोर आल्या. दरम्यान, कृषी मंत्री खोत यांनी बोगस तणनाशक प्रकरणी जिल्ह्यातील तीन कृषी केंद्र चालकांवर निलंबनाची कारवाई केली. परंतू या कारवाईने आता, कृषी विभागाच्या वुर्तळात गोंधळ उडाला आहे. कृषी केंद्र चालक या कारवाईच्या विरोधात गेले असून तणनाशक औषधांच्या कंपन्या सोडून विक्रेत्यांवर कारवाई कशी? असा मुद्दा यामुळे उपस्थित झाला आहे.
पिकांमधील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी तणनाशक औषधांची फवारणी करत आहेत. तर पिकांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी टॉनिक व किटकांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीड नाशकांचा फवारा सध्या पिकांवर मारल्या जात आहे. परंतू या औषधांच्या फवारणीचा विपरीत परिणाम झाल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला. मेहकर तालुक्यातील कळपविहिर याठिकाणी १६ एकरातील सोयाबीन तर लोणार तालुक्यातील शारा शेतशिवारातील १५ एकर शेतातील सोयाबीन पीक तणनाशक फवारणीमुळे जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचबरोबर चिखली तालुक्यातही एका ठिकाणी तणनाशक फवारणीमुळे सोयाबीन पिक करपल्याचा प्रकार गत आठवड्यामध्ये समोर आला. कृषी विभागाने या सर्व ठिकाणी पाहणी केली. दरम्यान, कृषी व फलोत्पादन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी १८ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यातील त्या कृषी केंद्र चालकांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हा कृषी अधिक्षकांनी तीन कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलंबित केले. तसेच बोगस बियाणे, किटकनाशके यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कारवाई करून संबंधित कृषि केंद्राचा परवाना निलंबित करावा, अशा सुचनाही दिल्या होत्या. त्यामुळे कृषी केंद्र चालक हे केवळ औषध विक्रीचे काम करतात, औषध निर्मितीचे काम कंपनी करते, तेंव्हा कंपनीवर कारवाई करण्याऐवजी विके्रत्यांवर कारवाई होत असल्याने कृषी केंद्र चालकांमधून रोष व्यक्त होत आहे.
कृषी केंद्र चालक आंदोलनाचा पावित्र्यात
कृषी केंद्र चालक हे नियमित शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासह त्यांची मदत करता. एखाद्या कंपनीचे तणनाशक, किटकनाशकाबाबत तक्रार असल्यास शेतकºयांनी कृषी केंद्र चालकांना साक्षीदार बनवून कंपन्यांच्या विरोधात तक्रार द्यावी, कृषी विभागाने कोणतीही चौकशी न करता कृषी केंद्र चालकांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करून नये, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा जिल्हाभर कृषी केंद्र बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधिकक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादन असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हाभरातील कृषी केंद्र चालक उपस्थित होते.
कृषी निविष्टांची गुणत्ता विक्रेत्यास कळणार कशी?
कृषी केंद्र चालकांना बियाणे, किटकनाशक, तणनाशक व रासायनिक खते यांचा सिलबंद माल खरेदी व विक्रीचा परवाना मिळतो. ज्या कंपनीला व त्यांच्या उत्पादनास कृषी विभागाला परवानगी दिलेली आहे, त्याच कंपन्याचे साहित्य कृषीकेंद्र परवानाधारक विकतात. त्यामुळे सिलबंद असलेल्या तणनाशक, किटकनाशकाची गुणवत्ता कृषी केंद्र संचालकास कशी कळणार? असा प्रश्न जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादन असोसिएशनचे पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे.