पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा - अब्दुल सत्तार
By ब्रह्मानंद जाधव | Published: April 10, 2023 06:47 PM2023-04-10T18:47:02+5:302023-04-10T18:47:35+5:30
पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
बुलढाणा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विविध शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी यंत्रणांनी दोन दिवसात तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, यातून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
कृषिमंत्री सत्तार यांनी जिल्ह्यातील पीक नुकसानाची १० एप्रिल रोजी पाहणी केली. खामगाव तालुक्यातील चितोडा आणि अंबिकापूर, तसेच बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे भेट देऊन नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत खा. प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, दिलीपकुमार सानंदा आदी उपस्थित होते.
नैसर्गिक संकटामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने एका पट्ट्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या भागात नुकसान झालेले नाही, अशा ठिकाणचे मनुष्यबळ नुकसान झालेल्या क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे गतीने पंचनामे होण्यास मदत होईल, कृषिमंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे सांगितले.
यंत्रणांनी तातडीने पंचनामे करावेत. याचा अहवाल सादर झाल्यानंतर शासनाच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे होणे आवश्यक आहे. या पंचनाम्यापासून कोणताही शेतकरी सुटू नये, त्यानंतर शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाचे क्षेत्रफळ ठरवावे. नुकसानाचे सर्वेक्षण करताना नुकसान झालेल्या शेती पिकासह शेतकऱ्यांची घरे, जनावरे, झाडे, फळपिकांचे झालेले नुकसान पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात यावेत. यंत्रणांनी सर्वेक्षण योग्यरित्या करून शासनास अहवाल सादर करावा, अशा सुचनाही कृषी मंत्र्यांनी दिल्या.
शासकीय यंत्रणांनी हयगय केल्यास कारवाई
शेतीमध्ये असलेले पीक आणि काढणीपश्चात शेतमालाचे नुकसान झाले असल्यास त्याचीही नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे नुकसानाची सर्वांगीण वस्तुनिष्ठ माहिती समोर यावी आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणांनी प्रत्येक शिवारात जाऊन सर्वेक्षण करावे, या कामात शासकीय यंत्रणांनी हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री सत्तार यांनी दिले.