Agriculture News : बियाणेकोंडीवर गुणनियंत्रकांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:11 AM2021-05-11T11:11:04+5:302021-05-11T11:11:15+5:30
Agriculture News: बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : गतवर्षी शेतकऱ्यांची बियाणेकोंडी झाली होती. अर्थात पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी दोन वर्षांत समोर आल्या. त्यामुळे आता ही बियाणे कोंडी थांबण्यासाठी कृषी विभागाने कृषी निविष्ठांची गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनातही बुलढाणा जिल्ह्याच्या सुमारे साडेसात लाख हेक्टरपैकी पावणेचार लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
दोन वर्षांपूर्वी अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले, तर गतवर्षी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले होते.
सदोष बियाणांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्यांकडून तक्रारी आल्या. बियाणेच न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र यातही बऱ्याच ठिकाणी वेळ निघून गेल्याने उत्पादनात घट झाली कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांची ही बियाणे कोंडी थांबण्यासाठी कृषी निविष्ठांची गुणनियंत्रकामार्फत तपासणी करण्याची मोहीम आखली आहे.
३८ गुणनियंत्रकांवर जबाबदारी
जिल्ह्यात बियाणांचे १,३८६, रासायनिक खतांचे १,३९६ व कीटकनाशकांचे १.३४० परवानाधारक वितरक आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग मिळून ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नेमण्यात आले आहेत. यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रक, मोहीम अधिकारी, कृषी विकास अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.
येत्या हंगामासाठी कृषी केंद्रांवरील बियाणांचे १,०६०, रासायनिक खतांचे ६२३ व कीटकनाशकांचे २१५ नमुने काढण्याचे लक्ष्यांक निर्धारित करण्यात आले आहेत.