खामगावात साकारणार वातानुकूलीत नाट्यगृह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:16 AM2017-11-23T01:16:58+5:302017-11-23T01:19:56+5:30
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १२00 प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त अशा वातानुकूलीत नाट्यगृहास मंजुरात मिळाली आहे. कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाने या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधीसुद्धा प्रदान केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १२00 प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त अशा वातानुकूलीत नाट्यगृहास मंजुरात मिळाली आहे. कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाने या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधीसुद्धा प्रदान केला आहे.
खामगाव ही विनोदी लेखक व नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची पावन भूमी असून, खामगाव येथे मोठमोठे दिग्गज नाटककार व साहित्यिक येऊन गेले आहेत; परंतु खामगावात भव्यदिव्य असे नाट्यगृह नाही. खामगावात अनेक नाट्य रसिक असल्याने एखादे भव्यदिव्य नाट्यगृह व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या अनुषंगाने ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ. अँड.आकाश फुंडकर यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकाराने नगरपालिकेला १२00 प्रेक्षकक्षमता असलेले संपूर्ण वातानुकूलीत असे प्रशस्त नाट्यगृह बांधकामास मंजुरात मिळाली आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. खामगाव शहरातील जे.व्ही.मेहता हायस्कूलच्या पाठीमागे हे भव्यदिव्य असे नाट्यगृह साकारण्यात येणार आहे. राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जे विशेष अनुदान देण्यात येते, त्या अनुदानातून या नाट्यगृहाला मंजुरात देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्र.न.पा.वै.२0१७/प्र.क्र.१७२ (२४) नवि-१६ मंत्रालय मुंबई दि. २0 नोव्हेंबर २0१७ नुसार या नाट्यगृहाला मंजुरात मिळाली आहे.
यासंदर्भात मंजुरातीचे व ५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येत असल्याचे पत्रही खामगाव नगर परिषदेला प्राप्त झाले आहे. खामगाव शहरात एक भले मोठे तसेच सुसज्ज असे नाट्यगृह असावे, ही नाट्यरसिकांची इच्छा यामुळे फलद्रूप होणार आहे.
मागच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्याकडे खामगावात भव्यदिव्य नाट्यगृह व्हावे, अशी मागणी केली होती. हिवाळी अधिवेशनापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ही मागणी पूर्ण केली. यामुळे नाट्यरसिकांसह सर्वच कलाप्रेमींची मोठी सोय होणार आहे.
- आ. अँड. आकाश फुंडकर
-