मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; आरोपींच्या अटकेसाठी कार्यकर्ते आक्रमक, बुलढाण्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 06:19 PM2022-02-25T18:19:22+5:302022-02-25T18:23:34+5:30
मनसेचे शहर सचिव अजय खरपास यांनी १९ फेब्रुवारी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपाहार्य पोस्टमुळे आ. श्वेता महाले यांचे बंधू शिवराज ...
मनसेचे शहर सचिव अजय खरपास यांनी १९ फेब्रुवारी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपाहार्य पोस्टमुळे आ. श्वेता महाले यांचे बंधू शिवराज पाटील, तसेच गोविंद देव्हडे, अंकुश तायडे, संजय अतार, सागर पुरोहित, मुकेश पडघान यांच्याकडून त्यांना मारहाण झालेली आहे. याबाबात पोलिसांत गुन्हा देखील दाखल झालेला आहे. यापृष्ठभूमीवर मनसेच्या वतीने २४ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत जिल्हाध्यक्ष बरबडे यांनी शुल्लक कारणावरून मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
एखाद्या व्यक्तीला हातपाय तोडण्यापर्यंत मारहाण करण्याइतपत कोणताही गुन्हा खरपास यांनी केला नव्हता. सोशल मीडियावर पोस्ट केली तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यायचे होते अथवा त्या विरोधात कायदेशीर तक्रार करायची होती. परंतु सत्तेचा गैरवापर करून आमदाराच्या बंधूने त्याला जिवे मारण्याच्या हेतूने बेदम मारहाण केली आहे. दरम्यान, मारहाणीनंतर तीन दिवस उलटलेले असतानाही आरोपी मोकाटपणे फिरत आहेत, असा आरोप बरबडे यांनी केला.
दरम्यान, चिखली शहरातील सामाजिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी याप्रकरणात सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने डीवायएसपी सचिन कदम यांचीही भेट घेतली आहे, असे स्पष्ट करून शहरातील शांततामय वातावरण भंग होऊ नये, यासाठी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावे, यापुढे मनसेच्या कोणत्याही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर अशा प्रकारचा हल्ला झाला तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी बरबडे यांनी दिला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार, प्रदीप भवर, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, शैलेश कापसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गुन्हेगारांना अटक का नाही -काळे
मारहाणीबाबत सबळ पुरावे उपलब्ध आहेत. गुन्हेगांराची ओळख देखील पटलेली असतानाही अटक करण्यासाठी पोलीस कशाची वाट पाहत आहेत, असा प्रश्नही मनसेचे प्रवक्ते ॲड. अजय काळे यांनी उपस्थित केला. खरपास यांच्या वतीने कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही ते म्हणाले.