‘महाराष्ट्र गीत’ लिहिणाऱ्या श्रीपाद कृष्णांच्या स्मारकाची प्रतीक्षा, अजित पवारांनी केली होती घोषणा
By विवेक चांदुरकर | Published: April 30, 2024 05:22 PM2024-04-30T17:22:36+5:302024-04-30T17:23:09+5:30
"महाराष्ट्र गीत" १९२६ साली श्रीपाद कृष्णांनी ज्या जळगाव जामोदच्या भूमीत लिहिले त्या नगराला आजही त्यांच्या स्मारकाची प्रतीक्षा आहे.
जळगाव जामोद : महाराष्ट्राचे समर्पक व यथार्थ वर्णन साहित्यिक तथा ज्येष्ठ नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्या ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या गीतातून केले आहे. "महाराष्ट्र गीत" १९२६ साली श्रीपाद कृष्णांनी ज्या जळगाव जामोदच्या भूमीत लिहिले त्या नगराला आजही त्यांच्या स्मारकाची प्रतीक्षा आहे.
२१ मे २०२२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार जळगाव जामोद येथे आले असताना त्यांनी जाहीर सभेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे स्मारक जळगाव जामोद येथे करण्यासाठी शासन पूर्णतः प्रयत्न करेल, याबाबतचे जागेसंबंधीचे कागदपत्र शासनाकडे सादर करावे, अशी घोषणा केली होती. परंतु, त्यानंतर सरकार बदलले आणि हा विषय थंडबस्त्यात पडला. आता अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर आरूढ झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता हा विषय पटलावर घ्यावा, अशी जळगावकर नागरिकांची मागणी आहे.
महाराष्ट्रात जे थोर साहित्यिक होऊन गेलेत त्यांच्या कर्मभूमीत शासनाने त्यांची स्मारके उभारून स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, जळगाव नगरात मात्र श्रीपाद कृष्णाचे स्मारक उभारण्याचा शासनाला पूर्णपणे विसर पडलेला दिसतो. जळगाव शिक्षण मंडळाने १९६५ साली सुरू केलेल्या महाविद्यालयास २९ जून १९७१ रोजी म्हणजे श्रीपाद कृष्णांच्या जन्मशताब्दी दिनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे नाव या महाविद्यालयास दिले. हा नामकरण सोहळा तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. श्रीपाद कृष्णाची एवढीच स्मृती जळगावात आहे.
आयुष्याची पंधरा वर्षे जळगावात
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे सन १९१८ मध्ये खामगाववरून जळगाव जामोद येथे आले. त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाररूममध्ये ज्या खुर्चीवर बसून ते लिखाण करीत त्या खुर्चीला "ऑथर्स चेअर" असे म्हटल्या जात असे. आयुष्याची महत्त्वपूर्ण शेवटची पंधरा वर्ष त्यांनी जळगावच्या भूमीत घालविली. या काळात त्यांनी साहित्य लेखन करून "विनोदाचार्य" ही उपाधी मिळविली. सन १९३३ पर्यंत म्हणजे पंधरा वर्ष त्यांचे वास्तव्य जळगावात होते. प्रकृती बिघडल्याने ते पुणे येथे गेले आणि १ जून १९३४ रोजी त्यांचे निधन झाले.