स्वातंत्र्याचे अमृतक्षण टिपणारा ‘अक्षय वट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:35 AM2021-08-15T04:35:54+5:302021-08-15T04:35:54+5:30
बुलडाणा : देशाच्या पहिल्या-वहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा जिवंत साक्षीदार बुलडाण्यात सापडणे कठीण होईल. मात्र, याच घटनेचा पहिला साक्षीदार वृक्षरूपाने आज ...
बुलडाणा : देशाच्या पहिल्या-वहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा जिवंत साक्षीदार बुलडाण्यात सापडणे कठीण होईल. मात्र, याच घटनेचा पहिला साक्षीदार वृक्षरूपाने आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत ऊन, वारा, पाऊस झेलत बुलडाण्यात हिरोळे पेट्रोल पंपाजवळ उभा आहे. त्या वृक्षाचे नाव आहे ‘अक्षय वट’.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन देशात सर्वत्र साजरा होत होता. येथील हिरोळे पेट्रोल पंपाजवळ बुलडाण्याचे जुने बसस्थानक होते. हे बसस्थानक रहदारीचे मुख्य केंद्र होते. यावेळी काही स्वातंत्र्य सैनिक, जागरूक नागरिक आणि तत्कालीन काॅंग्रेसचे पुढारी हे सगळे जण एकत्र आले. या सगळ्या मिळून पहिले ध्वजारोहण केले. या ध्वजारोहणाच्या आठवणीसाठी या जागेच्या बाजूला वडाचे झाड लावण्यात आले. त्यालाच ‘अक्षय वट’ असे म्हणतात. हा अक्षय वट आज बुलडाण्यातील पहिल्या स्वातंत्र्य दिन आणि ध्वजारोहणाचा साक्षीदार आहे. नंतर स्वातंत्र्य चळवळीला ५० वर्षे झाल्यानंतर नगर पालिकेने या झाडाला लहानसे कपाऊंड तयार केले. तर जुन्या पिढीतील व्यक्तीच्या ऐकीव माहितीवर एक लहानशी कोणशिला लावली. यंदापासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात होत आहे. तेव्हा या अक्षय वटाजवळसुद्धा ध्वज उभारून १५ ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्यात यावे अशी सुज्ञ बुलडाणेकरांची मागणी आहे.
कोणी केले होते पहिले ध्वजारोहण?
तत्कालीन विदर्भ हा मध्यप्रदेशमध्ये येत होता. तेव्हाच्या मध्य प्रदेश राज्याचे उपसभापती पंडित दिनकर कानडे शास्त्री यांच्या हस्ते पहिले ध्वजारोहण झाले होते. त्यावेळचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष सी.डी. गुप्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते. पहिला ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम जनतेने घडवून आलेला उत्स्फूर्त असा उपक्रम होता.