पशुसंवर्धन विभागातील सर्व कर्मचारी गायब
By Admin | Published: May 22, 2017 07:35 PM2017-05-22T19:35:48+5:302017-05-22T19:35:48+5:30
खामगाव : येथील पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील सर्वच्या सर्व कर्मचारी एकाचवेळी गायब झाल्याचे गंभीर चित्र सोमवारी दुपारी ४.३० ते ५ वाजेदरम्यान दिसून आले.
नितीन निमकर्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील सर्वच्या सर्व कर्मचारी एकाचवेळी गायब झाल्याचे गंभीर चित्र सोमवारी दुपारी ४.३० ते ५ वाजेदरम्यान दिसून आले.
पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एन.एच.बोहरा हे सोमवारी अकोला येथे बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे कार्यालय सांभाळण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर होती. परंतु दुपारी ४.४० च्या सुमारास प्रस्तूत प्रतिनिधीने या विभागास भेट दिली असता कार्यालयात चक्क शुकशुकाट दिसून आला. सर्व खुर्च्या व टेबल रिकामेच होते. थोडावेळ वाट पाहूनही कोणीच न आल्याने यासंदर्भात माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांचे दालन गाठले असता तेही बंद होते. अतिरिक्त गटविकास अधिकारी काळपांडे हे सुध्दा सुटीवर होते. गटविकास अधिकारी शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ह्यनो रिप्लायह्ण आला. तर काळपांडे यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बोहरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण महत्वपूर्ण बैठकीसाठी अकोल्याला आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी दौऱ्यावर किंवा सुटीवर गेल्यानंतर कर्मचारी कार्यालय वाऱ्यावर सोडून जात असून त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही बीडीओंसह विभागप्रमुख गैरहजर
खामगाव पंचायत समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती असून कामाचे स्वरुप व विस्तार पाहता या ठिकाणी दोन गटविकास अधिकारी देण्यात आलेले आहेत. गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्यासह अतिरिक्त गटविकास अधिकारी म्हणून काळपांडे सुध्दा कार्यरत आहेत. परंतु प्रस्तूत वेळी दोन्ही अधिकारी तसेच पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ.बोहरा हे गैरहजर होते. त्यामुळे कामानिमित्त ग्रामिण भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.
अकोला येथे महत्वपूर्ण बैठक असल्याने मी दौऱ्यावर आहे. कार्यालयात कोणी हजर नसल्याचे आपणास माहित नाही. कार्यालयातील कर्मचारी चहा वगैरे पिण्यासाठी बाहेर गेले असावेत. यासंदर्भात माहिती घेवून योग्य ती कार्यवाही करु.
- डॉ.एन.एच.बोहरा
पशुसंवर्धन अधिकारी, पंचायत समिती, खामगाव