तालुक्यातील सर्व महा-ई सेवा केंद्र बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:26 AM2017-11-14T01:26:03+5:302017-11-14T01:26:13+5:30
शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने महा-ई सेवा केंद्रचालकांनी १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महा-ई सेवा केंद्रचालकांनी १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
शासनाची ध्येय धोरण, लोकहितकारी विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याठी सरकारने २00८ ला महा-ई सेवा केंद्र सुरु केले होते. त्यावेळेस हजारो सुशिक्षित बेकारांनी आपल्याकडील जमीन-दागिने, तर वेळप्रसंगी कर्ज काढून स्वत: गुंतवणूक करुन सरकार नियुक्त महा-ई सेवा केंद्र सुरू करुन रोजगार सुरु केला; परंतु मध्यंतरीच्या काळात सरकार तथा नियुक्त आस्थापनेद्वारा प्रत्येक ग्रा.पं. मध्ये सरकारी खर्चाने ‘संग्राम’ उभारणी व अर्जदाराची कोणतीही चौकशी न करता एकाच गावात डिजिटल सेवा केंद्र मोफत वाटण्यात आले. महा-ई सेवा केंद्रातून मिळणार्या सर्व सुविधा वरील संदर्भान्वये या संग्राम आणि सी.एस.सी. केंद्रांनाही दिल्याने एकाच गावात मोठय़ा प्रमाणात दुकानदारी सुरु झाली. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला होता. दरम्यान, या निवेदनाबाबत शासन स्तरावर अद्यापही दखल घेतल्या गेलेली नाही. नवीन धोरणानुसार २४ नोव्हेंबर रोजी सीएससी केंद्रांना महा-ई सेवा केंद्राच्या सर्व सेवा देण्याचा निर्णय प्रत्यक्षात अमलात येण्याची शक्यता असल्याने महा-ई सेवा केंद्रचालकांच्या मागणीबाबत तातडीने कारवाई अपेक्षित होती; मात्र तसे न झाल्याने आंदोलनात्मक पवित्रा घेत १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय संप पुकारला. परिणामी तालुक्यातील सर्व ३२ महा-ई सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेवाकेंद्रातून मिळणारे दाखले उपलब्ध न झाल्याने नागरिकांनादेखील गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शासनाने आमच्या मागणीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनोज गायकवाड, उध्दव थुट्टे पाटील, सुनील राठोड, नंदकिशोर गोडवे, मो.शहा, बनकर, राहुल खरात, शिवदास मोटे, शिवदास कापसे, विजय महाजन, गणेश सोळंकी, दीपक शेटे, गजानन आखरे, इम्रान खान, पुरूषोत्तम पडघान, विनोद भगत आदी महा-ई-सेवा केंद्रचालकांनी केली आहे.