मानसिक त्रासातून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आराेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:32+5:302021-08-01T04:32:32+5:30
नातेवाइकांची पाेलीस स्टेशनमध्ये धाव : पाेलिसांना घातला घेराव धाड : सातगाव येथील विजयसिंह रामसिंग पाटील यांचा ३० ...
नातेवाइकांची पाेलीस स्टेशनमध्ये धाव : पाेलिसांना घातला घेराव
धाड : सातगाव येथील विजयसिंह रामसिंग पाटील यांचा ३० जुलै रोजी मृत्यू झाला़ त्यांचा मृत्यू हा बुलडाणा येथील रुखाई कन्या विद्यालय संस्थेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या मानसिक त्रासातून झाल्याचा आराेप करीत नातेवाईकांनी ३१ जुलै राेजी धाड पाेलिस स्टेशनमध्ये धडक दिली़ तसेच कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाेलिसांना घेराव घातला़ मागणी मान्य हाेत नसल्याचे लक्षात येताच मृतदेहच पाेलीस ठाण्यात आणण्याची तयारी नातेवाईकांनी केली हाेती़ त्यामुळे धाड पाेलीस स्टेशन परिसरात तणाव निर्माण झाला हाेता़
सातगाव ता.बुलडाणा येथील विजयसिंह रामसिंग पाटील हे बुलडाणा येथील श्री गणेशा शिक्षण संस्था द्वारा संचालित रुखाई कन्या विद्यालय बुलडाणा येथे परिचर म्हणून नोकरीत होते़ त्यांना संस्थेकडून २००७ पर्यंत त्यांना नियमित पगार मिळाला़ मात्र त्यानंतर त्यांना संस्थेच्या वतीने नंतर पगार देण्यात आला नाही़ त्यामुळे त्यांनी वारंवार या संदर्भात शासनाकडे आणि संस्थेकडे निवेदने व मागण्या करनही त्यांना न्याय मिळाला नाही. आजपर्यंत आपल्याला उचित न्याय मिळण्यासाठी त्यांनी उपरोक्त संस्थेकडे आणि शासनदरबारी निवेदने दिलेले आहेत़ अशातच त्यांचा ३० जुलै रोजी रात्री सातगाव येथे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर शनिवारी सकाळी त्यांच्या मुलांनी आणि नातेवाइकांनी विजयसिंह रामसिंग पाटील यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी नेला़ तसेच त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पेालीस ठाण्यात धडक दिली़ स्थानिक पोलिसांनी याबाबत कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसताच मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घालत अगोदर गुन्हे दाखल करा नंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेतली़ मात्र पोलिस याबाबत कुठलीच कारवाई करत नसल्याचे दिसून आल्यानंतर नातलगांनी सरळ मृतदेहच ठाण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू केली हाेती़ अखेर तब्बल दहा तासानंतर धाड पोलिसांनी संबधित संस्थेच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिराने सुरु केली होती.वृत्त लिहिस्ताेवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता़
परिसरात तणाव, बंदाेबस्त वाढवला
शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आक्रमण झाल्याने धाड पाेलीस स्टेशन परिसरात तणाव निर्माण झाला हाेता़ परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने तेथे दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले हाेते़ तसेच मृत विजयसिंह पाटील यांचे नातेवाईक सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाेलीस ठाण्यात ठाण मांडून हाेते़